शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले, “मुंबईत एका बाजूला मुडदे पडले आहेत, निरपराध लोक मरण पावले आहेत आणि आपले कार्यवाहक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यासमोरच रोड शो करत आहेत. हे सगळं किती असंवेदनशील आहे. ईशान्य मुंबईत राज ठाकरे, नारायण राणे आणि इतर नेते फिरत आहेत, रस्त्यावर उतरले आहेत. खरंतर आम्हीच त्यांना रस्त्यावर उतरवलं आहे. ही मंडळी आज भाजपासाठी घाम गळतेय. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत घेतली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांना आज चांगले दिवस आले असते. भाजपाने त्यांना भाड्याने घेतलं आहे. त्यांच्यासह अनेकांना भाड्याने घेतलंय.”

संजय राऊत म्हणाले, “भाड्याने घेतलेल्या या लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय. कारण मोदींनी गेल्या दहा वर्षात काही कामं केली नाहीत. भाजपा जे काही दावे करतेय ते ऐकून प्रश्न पडतो की, गेल्या १० वर्षांत यांनी काय दिवे लावले आहेत? मागील लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे असं म्हणत होते की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका. तेच राज ठाकरे आज भाजपाच्या पखाल्या वाहत आहेत हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटतं.”

दरम्यान. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करणार आहेत तर राज ठाकरे १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत. यावरही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, “राज ठाकरे ज्या धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत तो डुप्लिकेट (नकली) धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण नाही. तो धनुष्यबाण चोरलेला आहे. एकनाथ शिंदे हे चोरीच्या मालावर हक्क सांगत आहेत आणि राज ठाकरे हे त्या चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत. ते नकली ओठ आहेत.”

हे ही वाचा >> “परदेशी लोकांसारखा दिसतो म्हणून माझ्याकडून…”, प्रसिद्ध भारतीय लेखकाने व्यक्त केली खंत

“आम्ही काँग्रेसच्या पंजावर मतदान करणार”

ठाकरे गटाचे खासदार म्हणाले, आम्ही काँग्रेसच्या पंजाला मतदान करतोय. हा पंजा त्याच काँग्रेसचा आहे, ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिक योगदान दिलं आहे. ज्या कमळाबाईला आम्ही २५ वर्षे मत देत होतो, त्याच कमळाबाईने या देशाची वाट लावली आहे, महाराष्ट्र लुटला आहे. त्यामुळेच आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन हा देश आणि या देशाचं संविधान वाचवायचं आहे. त्यासाठीच आम्ही एकमेकांबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. निशाणी कोणतीही असो, आमची लढाई हा देश वाचवण्याची आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या पंजाला मतदान करत आहेत, तर राज्यभरात काँग्रेसचे अनेक नेते मशालीवर आणि तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहिलं असेल, आज पुन्हा पाहणार आहात.