Sanjay Raut on BMC Election Mumbai Mayor : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (रविवार, ५ ऑक्टोबर) दिवसभरात दोन वेळा भेट झाली. आधी एका सार्वजनिक कार्यक्रमात आणि त्यानंतर मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. दुसरी भेट राजकीय होती असं शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत हे दोघे भाऊ पच वेळा भेटले आहेत. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोघांचे पक्ष युती करतील अशी चर्चा असतानाच दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे या युतीवर शिक्कामोर्तब कधी होणार, युतीची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही, तर कडवट मराठी आणि भगव्या रक्ताचा मराठी माणूस मुंबईचा महापौर होईल असं राऊत म्हणाले.

“मराठी बाण्याचा व भगव्या रक्ताचा माणूस मुंबईचा महापौर होणार”

संजय राऊत म्हणाले, “मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा असेल, मराठी बाण्याचा असेल. भाजपावाले किंवा मिंधे (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) सांगतायत तसा महापौर नसेल. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही.”

मुंबईत ठाकरे बंधुंचा महापौर होणार : राऊत

शिवसेनेचे (उबाठा) खासदार म्हणाले, “मुंबईचा महापौर होईल तो आमचाच असेल. मी आमचा म्हणतोय. आमचा म्हणजे आमचाच. मी ‘हम’ या शब्दाने बोलतोय.” यावर वार्तहारांनी राऊत यांना विचारलं की ठाकरे बंधुंचा महापौर होईल असं सुचवताय का? त्यावर राऊत म्हणाले, “होय! मुंबईत ठाकरे बंधुंचा महापौर होणार. ही युती फार वेगळी आहे. ये दिल और दिमाग से बनी हुई गठबंधन हैं.”

राज व उद्धव ठाकरे यांच्या होऊ घातलेल्या कथित युतीबाबत मविआची भूमिका काय?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राऊत यांनी आधी आघाडीच्या माध्यमातून चर्चा सुरू करायला हवी. चर्चेला फार विलंब करू नये. आघाडीत सहकार्याची भूमिका घेऊन एकत्र लढू. वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरीवरील स्थितीनुसार प्रत्येक ठिकाणी निर्णय घेता येतील.”

शिंदे म्हणाले, “राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. त्यांनी आधी त्यांची युती जाहीर करावी. महाराष्ट्र व आम्ही त्यांच्या निर्णयाची, घोषणेची वाट पाहतोय. सध्या तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहोत. त्यांच्या युतीची घोषणा होऊ द्या, त्यानंतर पुढे काय चर्चा करायची त्याबाबत निर्णय घेतला जाईल.”