Sanjay Raut on Jalgaon Harassment Case : जळगावातील आदिशक्ती मुक्ताई यात्रेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीशी आणि तिच्या मैत्रिणींशी काही टवाळखोर तरुणांनी छेडछाड केल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यात महिलांविरोधातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारवर टीका होत असतानाच ही घटना घडल्यामुळे गृहखातं आणखी अडचणीत आलं आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. खासदार राउत म्हणाले, “वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे यांच्यासारख्या प्रवृत्तीच्या सामाजिक कार्यकर्त्याने रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. तो विनयभंग करणारा कार्यकर्ता कोण होता? कोणत्या नेत्याच्या जवळचा होता ते आम्ही ‘सामना’च्या (शिवसेना उबाठा गटाचं मुखपत्र) पहिल्या पानावर छापलं आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याचे फोटो आहेत. त्यापैकी एक फोटो आम्ही ‘सामना’मध्ये छापला आहे. अशा प्रवृत्तीचे हे लोक स्वतःला शिवसेनेचे वारसदार म्हणवून घेतात. यांचा नेता जसा आहे, तसेच त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहायला, पोलीसखातं सांभाळायला वेळ नाही. कारण त्यांचा सगळा वेळ राजकारण करण्यात जातोय. रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारा तो कार्यकर्ता कोण आहे, वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे यांच्यासारखा तो देखील एक सामाजिक कार्यकर्ताच आहे. त्याचा फोटो आम्ही दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर छापला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्र्यांबरोबर (एकनाथ शिंदे) त्याचा फोटो आहे. मला या लोकांना विचारायचं आहे की महाराष्ट्रात तुम्ही सत्तेच्या बळावर काय करताय? हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे कार्यकर्ते एकाच विचारांचे आहेत. सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. जिकडे सत्ता तिकडे व्यभिचारी, बलात्कारी, खुनी व हत्यारे लोक आहेत”.

संजय राऊतांचा संताप

शिवसेना (उबाठा) खासदार म्हणाले, “काल आम्ही ठाण्याला गेलो होतो. तिथे काही गुंडांनी आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अडवलं. आनंद दिघे यांच्या आश्रमासमोर आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आनंद दिघे यांचा तो आश्रम आणि त्या आश्रमाची संपूर्ण मालमत्ता एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. तिथे त्यांचे गुंड होते. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र चोख बंदोबस्त ठेवला होता. काल आमच्यावर हल्ला करणारे व जळगावात रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे लोक एकाच प्रवृत्तीचे होते. त्याच पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आणि हे वारसदार म्हणून मिरवतायत. हे सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचा वारसा सांगत आहेत. जसा नेता तशी पोरं. माझी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams eknath shinde shivsena over raksha khadse daughter harassment case asc