महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. त्याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता करोना काळातही राज्यात हलगर्जीपणा झाला होता. त्या काळातल्या हलगर्जीपणाबद्दल आजही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर याविषयी संजय राऊत यांना राज ठाकरेंबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा उल्लेख भाजपाचा पोपट असा केला आहे. मात्र या विधानामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता. आपण जाणून घेऊ तेव्हा काय घडलं होतं?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

भारतीय जनता पक्षाने काही पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू द्या. नोटबंदीच्या वेळेस हजारोंच्यावर लोक रांगेत उभं राहून मृत्यूमुखी पडल होते. तो सदोष मनुष्यवधच होता. त्यावरही भाजपाच्या पोपटांना बोलावं. करोनाच्या वेळेस गंगेत हजारो प्रेतं वाहत आली होती. गुजरातमध्ये तर प्रेतं जाळायला जागाही नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. 

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना बारामतीचा पोपट असं का म्हणाले होते?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू होता. त्यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात त्यांचा प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविषयीचे व्हिडीओ आपल्या भाषणांमधून सादर करत त्यांनी आता देशाला नवा पर्याय कसा हवा आहे ते आपल्या भाषणांमधून बोलून दाखवलं होतं. त्यांचं ते प्रत्येक भाषण आणि लाव रे तो व्हिडीओ म्हणण्याची स्टाईल आजही लोकांच्या लक्षात आहे. २०१९ च्या निवडणुकीत मग राज ठाकरेंनी मोदींचा कडाडून विरोध करण्याची खेळी खेळली. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि २०१९ पर्यंतच्या विधानांचे व्हिडिओ दाखवले. मोदींनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषणं केली आणि सभा घेतल्या होत्या. लोकांना राज ठाकरेंनी घेतलेली ती भूमिका अजूनही लक्षात आहे.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांना जेव्हा राज ठाकरेंबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता. तसंच राज ठाकरेंची स्क्रिप्ट ही बारामतीहून येते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आज संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा उल्लेख भाजपाचा पोपट असा केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या त्या उल्लेखाची आठवण अनेकांना झाली आहे.

२०१९ ला काय म्हणाले होते फडणवीस?

“गल्लीतले लोकही आजकाल बोलायला लागले आहेत. मला ठाऊक आहे की ते कलाकार आहेत. कलाकाराचं काम काय असतं? जी स्क्रिप्ट लिहून दिली त्यावर अभिनय करायचा. अलिकडच्या काळात त्यांची (राज ठाकरे) स्क्रिप्ट कुठून येते तुम्हाला माहित आहे, बारामतीहून येते आहे. बारामतीला पोपटांची कमतरता भासली की ते नवीन पोपट शोधतात. जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून वदवतात. आपण काही लक्ष देण्याची गरज नाही. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही. एखाद्या टीम मध्ये नॉन प्लेयिंग कॅप्टन असतो किंवा बारावा गडी असतो. हे नॉन प्लेयिंग कॅप्टनही नाही आणि बारावा गडीही नाहीत. ते जरी असते तरी लक्ष दिलं असतं. त्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारीवर ते अनेक दिवस ते भाषणं करत राहतील. ज्यांना लोकं मतंही देत नाहीत, ज्यांना निवडूनही देत नाहीत, ज्यांच्याकडे लक्षही देत नाहीत त्यांच्या भाषणाने कुणी विचलित होणार नाही. “

राज ठाकरेंची भूमिका पुन्हा बदलली?

२०१९ ला विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या सगळ्यानंतर २१ जून २०२२ ला महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. त्याआधी राज ठाकरेंची भूमिका ही भाजपाला साजेशी झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपाला ३०० हून अधिक जागा मिळाल्या. पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसले. तर राज्यात जून २०२२ मध्ये जो सत्तासंघर्ष झाला त्याआधी मशिदींवरचे भोंगे हटवण्याचं राज ठाकरेंचं आंदोलन हे चांगलंच गाजलं होतं. तसंच राज ठाकरेंना बारामतीचा पोपट म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातली जवळीक इतकी वाढली आहे की मनसे-भाजपा युती होईल अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा उल्लेख भाजपाचा पोपट असा केला आणि सगळ्यांनाच देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्याची आठवण झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut today said raj thackeray is bjp parrot but fadnavis called him baramati parrot in 2019 scj