सातारा : मागील दीड वर्षांपासून तांत्रिक कारणास्तव रखडलेल्या सातारा पोलिसांच्या नवीन गृहनिर्माण संकुलामधील सदनिकांचे येत्या दिवाळीत वितरण केले जाणार आहे. ६९३ सदनिकांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सातारा शहरातील वाढत्या अवैध व्यवसायासंदर्भात कठोर कारवाया सुरूच आहेत, आपणास असे काही आढळल्यास आपण माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहा उपविभागाचे उपअधीक्षक यावेळी उपस्थित होते.

सुनील फुलारी म्हणाले, सातारा पोलिसांची गुन्हे उकल (डिटेक्शनचे) प्रमाण ८० टक्के इतके आहे. मात्र डिटेक्शन प्रकरणामध्ये मुद्देमालांची शोध व जमा वाढवायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सातारा पोलिसांनी गणेशोत्सव आणि नवरात्र या काळामध्ये अत्यंत कार्यक्षमतेने कायदा व सुव्यवस्था सांभाळली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ३५ मंडळांवर खटले भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा या संदर्भातील पोलिसांच्या ध्वनिप्रदूषणाच्या कारवाया सुरूच राहणार आहेत.

सातारा जिल्हा पोलिसांनी सीआयआर कार्यक्रमात म्हणजे गहाळ मोबाइल पुनर्प्राप्ती (रिकव्हर)करण्यामध्ये शंभर टक्के कामगिरी नोंदवली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात सातारा जिल्हा पोलीस हे प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सातारा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय विशेषतः मटका कारवायांवर पोलिसांकडून योग्यता रकमा न दाखवता थातूरमातूर रकमांच्या कारवाया दाखवल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला असता फुलारी म्हणाले, या संदर्भातील आपण मला पुरावे द्या त्यावर मी कारवाई करतो. सातारा जिल्ह्यातील आठ टोळ्यांवर मोकाअंतर्गत मोठ्या कारवाया करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या नवीन गृहसंकुलाचे गेल्या दीड वर्षापासून उद्घाटन रखडले आहे. या संदर्भात पत्रकारांनी फुलारी यांना छेडले असता, त्यांच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी उत्तर दिले. गृहसंकुलाच्या संदर्भातील सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग बोर्ड यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या इमारतीमध्ये साडेपाचशे चौरस फुटाच्या सदनिका आहेत. या सदनिकांची सोडत येत्या दिवाळीपर्यंत काढण्यात येऊन त्यांचे वितरण सोडत पद्धतीने केले जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोयीस्कर तारखा घेऊन या प्रकल्पाचे रितसर उद्घाटन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सातारा शहरातील अवैध मटका व्यवसाय ठिकठिकाणी सुरू आहे, तसेच चक्री जुगारही मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे, त्या संदर्भात बोलताना दोशी म्हणाले, सातारा शहर शाहूपुरी पोलिसांना या संदर्भात कठोर कारवाईच्या यापूर्वीच सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते नुकतेच कोल्हापूर परिक्षेत्रात कर्तव्यपूर्ती मेळावा झाला. यामध्ये विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांचे पदक आणि प्रमाणपत्र देऊन फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फुलारी यांचे सातारा पोलीस दलाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.