​सावंतवाडी : ​सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढण्याची तयारी करत असून, त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून उल्का उमाकांत वारंग यांचे नाव जाहीर केले आहे. महायुतीकडून (भाजप आणि शिंदे शिवसेना) सन्मानपूर्वक चर्चेत सहभागी करून घेतले नाही तर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी २० उमेदवार रिंगणात उतरतील, असा इशारा तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.

​तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी सांगितले की, सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाला) भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून चर्चेला सुद्धा बोलावण्यात आलेले नाही. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरून चालायला देणार नाही.

​”उद्या बुधवारपर्यंत सन्मानपूर्वक चर्चेत सहभागी करून घेतले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत आम्ही यासाठी वाट पाहू, अन्यथा नगराध्यक्ष पदासह वीसही जागेवर आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली आहे,” अशी माहिती भोसले यांनी दिली.

​भोसले यांनी महायुतीला सूचक इशारा दिला:

“राष्ट्रवादीला कमी लेखाल तर अडचणीत याल आणि बरोबर घेतला तर यश मिळवाल.” ​ते म्हणाले, “आमची महायुती व्हावी अशी मनीषा आहे. त्यासाठी आम्ही आमचे दरवाजे खुले ठेवले आहेत, परंतु आम्हाला कोणीही कमी लेखू नये. उद्या मतदानानंतर निकालावेळी उमेदवार पराभूत झाल्यास, त्याला भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही पक्ष जबाबदार राहतील.” ​अंतिम मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत महायुतीसाठी वाट पाहणार आहोत.​ समोरून कोणीही न बोलावल्यास ‘एकला चलो’ची भूमिका घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

​नगराध्यक्ष पदासाठी उल्का उमाकांत वारंग यांचे नाव निश्चित करण्यात आले असून २० जागांसाठी जनतेमधील उच्च शिक्षित उमेदवार निश्चित केले आहेत. भोसले यांनी येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उमाकांत वारंग, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी सावंत, प्रदेश महासचिव शफिक खान, अनंतराज पाटकर, महिला तालुकाध्यक्ष सिद्धी परब, शहर अध्यक्ष ऑगस्तिन फर्नांडिस, महिला जिल्हा उपाध्यक्ष रंजना निर्मल, मानसी देसाई, गुरुदत्त कामत, अशोक पवार, सत्यजित देशमुख आदी उपस्थित होते.

​यावेळी सुरेश गवस यांनी राष्ट्रवादी सिंधुदुर्ग संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचाराला येणार असल्याचे सांगितले. उमाकांत वारंग यांनी, “आम्ही पुरोगामी विचारांचे असल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून देऊ,” असे सांगितले.