Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray : शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवसेनेवर (शिंदे) व भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. या मुलाखतीवेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं की विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ५० हून अधिक जागा निवडून आल्या, हा काही जादूटोणा आहे की काय? त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कदाचित त्यांनी डायनोसॉर कापला असेल.” उद्धव ठाकरे यांच्या या टिप्पणीवर शिवसेनेचे (शिंदे) नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “लोकसभेवेळी तुमच्या भरपूर जागा आल्या होत्या. तेव्हा तुम्ही दोन डायनोसॉर कापले होते का?”
संजय राऊत म्हणाले, अनेक घोटाळे करून महायुतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचं दिसतंय. भाजपाचं सोडा, शिंदे गटाला देखील ५० हून अधिक जागा मिळायला हा काय जादूटोणा आहे की काय? जादूटोणा करून इतक्या जागा त्यांनी निवडून आणल्या की काय? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “कदाचित त्यांनी डायनोसॉर कापला असेल.”
“तिथे तुम्ही दोन डायनोसॉर कापले होते का?”
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही डायनोसॉर कापला तर तुम्ही लोकसभेला काय कापलं होतं? विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी लोकसभा निवडणूक पार पडली होती. त्या निवडणुकीत तुम्हाला प्रचंड यश मिळालं होतं. तुमच्या ज्या जागा कधीच निवडून येणार नाहीत असं तुम्हाला वाटत होतं त्या जागांवरही तुमचे उमेदवार निवडून आले. तिथे तुम्ही दोन-दोन डायनोसॉर कापले होते का?”