महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर सामान्य लोक आणि मनसे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात आहेत. महायुतीकडून राज ठाकरेंचे आभार मानले जात आहेत. तर महाविकास आघाडीकडून टीका होते आहे. आज पहिल्यांदाच शरद पवारांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.

राज ठाकरेंनी काय म्हटलं ?

“येणारी लोकसभेची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे. आपण खड्ड्यात जाणार की वरती जाणार आहोत. अनेक निवडणुका येतील. विधानसभेच्याही निवडणुका येतील. पण आज हाणामाऱ्या सुरु आहेत. विधानसभेला तर कोथळे बाहेर येतील. मी मागच्या भाषणात बोललो होतो महाराष्ट्रात चुकीचा फुटला आहे. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. मध्यंतरी मी पुण्याला गेलो होतो. तिथे पाचजण राष्ट्रवादीचे नगरसेवक. मी म्हटलं कुणाचे? तिघे म्हणाले आम्ही दादांचे, दोघे म्हणाले आम्ही शरद पवारांचे. अशा सगळ्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. महाराष्ट्राकडूनही माझी अपेक्षा आहे की त्यांनी व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे त्याला राजमान्यता मिळाली तर भीषण दिवस आहेत.”

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा, अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली. त्यानंतर आता शरद पवारांचं वक्तव्य समोर आलं आहे.

हे पण वाचा- “राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले शरद पवार?

राज ठाकरेंचे तीन-चार निर्णय मी दहा पंधरा वर्षात पाहिले. कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचं होतं हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसात काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करु शकतील. अनेक संस्था काम करत असतात, एजन्सीज काम करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला का? हे काही मला माहीत नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत सामान्य माणसं संभ्रमात आहेत असं शरद पवारांना विचारलं असता “मी पण सामान्य नागरिक आहे” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. ज्यावर सगळ्यांनाच हसू अनावर झालं.