एकनाथ सिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय वादळ निर्माण झालं असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची सत्ताच दोलायमान अवस्थेत आली आहे. भाजपासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याची एकनाथ शिंदेंची अट उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावल्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा गट कोणती भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत हा ‘शिवसेना बाळासाहेब’ गट असल्याचं बोललं जात असताना राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीवर त्याचे कोणते परिणाम होतील? अशीही चर्चा सुरू झाली आहे. या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सत्तापरिवर्तनासाठीच हा सगळा खटाटोप”

राज्यात सत्तापरिवर्तनासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याचा आरोप शरद पवारांनी बंडखोर आमदारांवर केला आहे. “शिवसेनेचा एक गट आसाममध्ये आहे. त्यांच्या वतीने जी विधानं आली, त्यातून एक स्पष्ट होतंय की त्यांना सत्तापरीवर्तन हवंय. त्यासाठी त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे. पण गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका आघाडीला पूर्ण पाठिंबा देण्याची आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल?

दरम्यान, अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पवारांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. यासाठी त्यांनी बंडखोर आमदार आणि त्यांच्या पाठिशी असणाऱ्या भाजपाचं गणित बिघडण्याचं कारण दिलं आहे. “ज्या लोकांनी बंडखोरी केलीये, त्यांची इच्छा आहे की इथे दुसरं सरकार यावं. राष्ट्रपती राजवट लागू केली, तर त्यांनी या लोकांना इकडून तिकडे करण्यासाठी जी मेहनत केली, ती वाया जाईल. त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही. पण जर राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर निवडणुका होतील”, असं पवार म्हणाले आहेत.

दिल्लीत उतरताच शरद पवारांचं एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर सूचक विधान; म्हणाले, “जे आमदार गेलेत…!”

दरम्यान, यावेळी राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तीन पक्षांची महाविकास आघाडी अशीच कायम राहील का? असा प्रश्न एका महिला पत्रकाराने विचारला असता पवारांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “आज तरी आमची आघाडी आहे, आघाडीला आमचा पाठिंबा आहे. आणि ही आघाडी पुढे कायम ठेवण्याची आमची इच्छा आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“संख्याबळ आहे तर ते गुवाहाटीत काय करतायत?”

दरम्यान, जवळपास ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंना शरद पवारांनी टोला लगावला आहे. “त्यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येचा ते दावा करत आहेत. आम्हाला आश्चर्य वाटतं की त्यांच्याकडे जर नंबर आहेत, तर ते तिकडे काय करतायत? मुंबईत येऊन राज्यपाल किंवा कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये सिद्ध करून टाका की तुमच्याकडे सदस्यसंख्या आहे”, असं पवार म्हणाले.

शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, शिवसेनेला विश्वास; वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू!

बंडखोरांच्या आरोपांना प्रत्युत्तर

यावेळी बोलताना शरद पवारांनी बंडखोर आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे गळचेपी झाल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले, “शिंदे आणि त्यांचे सहकारी अडीच वर्ष सरकारमध्ये होते. या काळात त्यांना राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांचा त्रास झाला नाही. आजच का त्रास होतोय? हे फक्त कारण पुढे केलं जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम केलं होतं”.

दरम्यान, या सगळ्या वादामध्ये सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar in delhi targets shivsena rebel mla eknath shinde uddhav thackeray pmw
First published on: 26-06-2022 at 18:48 IST