सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले. भाजप महायुती सरकारवर कंत्राटदारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत, सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
आंदोलनाची पार्श्वभूमी
जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचे पैसे मिळत नसल्याने सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटदारांमधील असंतोष वाढला आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची २४० कोटी रुपये (त्यापैकी कणकवली डिव्हिजनचे १०९ कोटी आणि सावंतवाडी डिव्हिजनचे १११ कोटी रुपये) आणि जलजीवन मिशन योजनेंतर्गत २४.२७ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. याशिवाय, जिल्हा वार्षिक योजना, २५/१५, आमदार फंड इत्यादी योजनांची कामे करणाऱ्या सुमारे ७०० ते ८०० तरुण कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले भाजप महायुती सरकारकडे थकलेली आहेत.
ठाकरे शिवसेनेचे गंभीर आरोप
शिवसेनेने आरोप केला आहे की, एका बाजूला तरुण कंत्राटदारांची बिले थकवली जात आहेत, तर दुसरीकडे हायब्रीड अन्युइटी अंतर्गत जिल्ह्यात १०० कोटी रुपयांची कामे सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कमिशन देऊन बिले अदा केली. धनदांडगे कंत्राटदार कमिशन देऊन आपली बिले मिळवत असताना, तरुण कंत्राटदार मात्र कर्जबाजारी झाले आहेत. बिलांच्या नावाखाली ठेकेदारांना सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. काही ठेकेदारांनी भाजपमध्ये प्रवेश करूनही त्यांना बिलाचे पैसे मिळाले नाहीत, असेही शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
देयके न मिळाल्याने ठेकेदारांवर अवलंबून असलेले कर्मचारी, इंजिनिअर, तसेच मालाचे पुरवठादार यांना देणी देणे शक्य होत नाही. बांधकाम मजूर संस्थांच्या मजुरांनाही याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे पैसे थकविणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे असे वैभव नाईक यांनी सांगितले.
या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू शेट्ये, धीरज मेस्त्री, तेजस राणे, गुरु पेडणेकर, उद्धव पारकर, लक्ष्मण हन्नीकोळ, माधवी दळवी, तात्या निकम, जयेश धुमाळे, ललित घाडीगावकर, रुपेश आमरोसकर, विलास गुडेकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.