Shivsena MLA Kishor Patil on Mahayuti : जळगावच्या पाचोरा येथे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार किशोर पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे. पाचोऱ्यातील निर्धार मेळाव्यात भाषण करताना किशोर पाटलांनी भारतीय जनता पार्टीवर आगपाखड केली. तसेच महायुतीचं सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप एकही रुपयाचा निधी मिळाला नसल्याचं सांगत घरचा आहेर दिला. यासह त्यांनी महायुतीमधील बंडखोरीवरून निशाणा साधला. किशोर पाटील यांनी मित्रपक्षांवर टीका केल्यामुळे महायुतीमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

आमदार किशोर पाटील म्हणाले, “सरकार स्थापन झाल्यानंतर एका वर्षात एक फुटकी कवडीसुद्धा युतीच्या काळात आमदारांना मिळालेली नाही. आता आम्हाला एकच आसरा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा. मी पाचोरा मतदारसंघातील जनतेच्या वतीने गुलाबराव पाटील यांना आवाहनवजा विनंती करणार आहे की ५० टक्के निधी जरी पाचोरा मतदारसंघाला मिळाला तर थोड्याफार प्रमाणात विकासाच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ पुढे जाईल. निश्चितपणे पाचोरा मतदारसंघाला त्याची गरज आहे.

भाजपावर टीका

शिवसेनेचे (शिंदे) आमदार म्हणाले, “महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अलीकडेच म्हणाले आहेत की ‘कोणी बंडखोरी केली तर त्याची पाच वर्षांसाठी भाजपातून हकालपट्टी केली जाईल.’ मात्र विधानसभा निवडणूक झाली तेव्हा हेच बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा मी रात्री दोन वाजता त्यांना फोन करायचो, तेव्हा ते माझा फोन उचलायचे नाहीत. मग एखादं चिटोरं लिहून पाठवायचे की अमूक व्यक्तीवर कारवाई करा. त्यांनीच आज बंडखोरी केली तरी पदाच्या रूपाने तुम्ही त्यांना शाबासकी देत आहात आणि कारवाई करत नाहीत.”