सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांची चौकशी आता दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडून होणार आहे. केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या चौकशीसाठीचा अहवाल ‘बँक सुरक्षा व फसवणूक’ विभागाकडे सोपवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी एकूण आठ वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुंबई येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी घेतली आहे. त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे (BS&F) वर्ग केले आहे. यामुळे या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे.
जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी ही बँक फसवणुकीची तक्रार केली होती. यामध्ये सन २०२१ ते २०२२ या कालावधीत कर्जाच्या रकमेचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
माजी आमदार राजन तेली यांच्यासह प्रथमेश राजन तेली, सर्वेश राजन तेली, प्रदीप मनोहर केरकर, शैलजा एम. सिंगबाळ, सीमा महेश सबनीस, रुजिता राजन तेली, आणि सुनील कृष्णा निरवडेकर या आठ जणांनी कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या कर्ज विभागाने केंद्रीय अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, मुंबई यांच्याकडे केली होती.
मुंबई येथील पोलीस अधीक्षकांनी या संबंधीतांची चौकशी करण्याचे आदेश २२ सप्टेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री राजकीय सूडबुद्धीने तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी लावत आहेत – माजी आमदार राजन तेली
विद्यमान सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री राजकीय सूडबुद्धीने विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून माझी चौकशी लावत आहेत. पण मी या धमक्यांना घाबरत नाही आणि कोणत्याही तपास यंत्रणांना सामोरे जाण्यास तयार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार राजन तेली यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेत केले.
तेली पुढे म्हणाले, “माझ्यावर पोलिसांवर दबाव आणून कारवाईचा प्रयत्न झाला. परंतु, पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाला झुकले नाहीत. आता सीबीआयची भीती दाखवली जात आहे, पण आम्ही घाबरत नाही.” तसेच, सीबीआयची कोणतीही नोटीस मला मिळालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी जिल्हा बँक कारभाराविरोधात नाबार्ड आणि इतर संस्थांकडे तक्रारी केल्या. त्यानुसार बँकेला चौकशीच्या नोटिसा देखील आल्या. मी भाजपमध्ये असतानाच मला २०२२ मध्ये बँकेकडून नोटीस आली होती, असे तेली यांनी सांगितले.
तेली यांनी आपल्या कर्जफेडीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मी उद्योजक असल्याने कर्ज घेतले आहे. यातील ९ कोटी ५१ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज फेड देखील केले आहे. व्यवसायात चढ-उतार असतात, त्यामुळे एक-दोन हप्ते थकताच. माझी कर्जफेड करण्याची मुदत २०३३ आहे. असे असतानाही मला नोटिसा पाठवून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि पालकमंत्री त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.”
विविध यंत्रणांच्या माध्यमातून माझी चौकशी लावली जात असली तरी, मी सर्व तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असा निर्धार राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.