गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र ही चर्चा तिथल्या राजकीय कलगीतुऱ्यापेक्षाही भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात झालेल्या जीवे मारण्याच्या तक्रारीवरून जास्त रंगली. अखेर आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपाच्या सिद्धिविनायक पॅलनं मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यात तर चक्क कोकणी भाषेत कलगीतुरा रंगू लागला आहे.

शेलार म्हणतात, देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान…!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपानं बाजी मारल्याचं स्पष्ट झालं. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करत महाविकासआघाडीवर टीका केली. “देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…” असं आशिष शेलार म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : “…याला अक्कल म्हणतात”, अजित पवारांना नारायण राणेंचा खोचक टोला!

पुढे “नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमित शाह म्हणाले त्याप्रमाणे हिंमत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या, आम्ही तयार आहोत”, असं म्हणत आशिष शेलार यांनी अमित शाह यांच्या विधानाची देखील आठवण महाविकास आघाडीला करून दिली.

सचिन सावंतांचं कोकणी स्टाईल प्रत्युत्तर!

दरम्यान, एकीकडे आशिष शेलार यांनी कोकणी स्टाईलने टीका केली असताना दुसरीकडे काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी देखील त्याच स्टाईलने त्यांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो” ; आशिष शेलारांनी साधला निशाणा

“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो”, असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

त्यामुळे एकीकडे सिंधुदुर्गात नारायण राणेंनी विजयानंतर महाविकास आघाडी सरकरावर निशाणा साधला असताना दुसरीकडे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये देखील राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.