कराड :  गणेशोत्सव काळात महामार्गावर वाढणारी रहदारी तसेच मुंबई-गोवा व सातारा-कागल या राष्‍ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले सहापदरीकरणाचे काम यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार पाटील यांनी यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, गणेश उत्सव संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरा केला जातो. मात्र, गणेशोत्सवाचे  ज्यादा आकर्षण महाराष्ट्रात असते. हा उत्सव महाराष्ट्रभर घरोघरी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

हेही वाचा >>> “रामाने विभीषणाला फोडलं होतं”, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बच्चू कडूंचं वक्तव्य, म्हणाले…

राज्यातील विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोजगारानिमित्त मुंबई, पुणे येथे राहतात. गणेश उत्सव काळात हे सर्व चाकरमानी आपआपल्या गावी आवर्जून येत असतात. गावी जाण्‍यासाठी एसटी, खासगी बस अथवा रेल्वे अशा वाहतूक साधनांचा वापर  होत असतो. गणेशभक्तांना आपआपल्या गावी सुखरूप पोहचविण्‍यासाठी कोकण रेल्वे मार्गावर तसेच मुंबई-पुणे-मिरज लोंढा या रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांमार्फत होत आहे.

याबाबत सेंट्रल रेल्वेच्या संबंधित अधिका-यांना सूचना देऊन मुंबईहून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग तसेच पश्चिम महाराष्‍ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात जाणा-या मुंबई, पुण्‍यातील गणेश भाविकांसाठी विशेष जादा गाड्या सोडण्याची व्यवस्था करावी. सध्‍या मुंबई-गोवा आणि सातारा-कागल या राष्‍ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गर्दीच्या काळात रेल्वेने गणेश भाविकांसाठी विशेष गाड्या सोडल्यास राष्‍ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन संभाव्य अपघातांचा धोकाही कमी होईल असे श्रीनिवास पाटील यांनी  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srinivas patil appeal railway minister danve to run additional trains for ganesh devotees zws