Shrinivas Pawar Speaks about Ajit Pawar: अजित पवार यांनी जुलै २०२३ या महिन्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयीचा संघर्ष रंगणार आहे. अशात आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. काकांनी काहीही दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आत्तापर्यंत अजित पवारांचं ऐकलं आता मात्र हा निर्णय पटलेला नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करुन घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. आता प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे.

हे पण वाचा- “..गजर घड्याळाचाच”, सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

काय म्हटलं आहे श्रीनिवास पवार यांनी?

“तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही.” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

भाजपाला शरद पवारांना संपवायचं आहे

साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. ज्यांनी आपल्याला चारवेळा उपमुख्यमंत्री केलं. २५ वर्षे मंत्री केलं अशा काकांना आपण हे विचारतोय? मला जर असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो. ही सगळी भाजपाची चाल आहे. भाजपाला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं होतं. घरातला व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो, याच नितीने भाजपा वागली आहे. शरद पवारांना एकुलती एक मुलगी आहे, साहेब आज दहा वर्षे जुने असते तर त्यांना काय केलं असतं सगळ्यांना माहीत आहे. वय वाढलं म्हणून त्यांना कमकुवत समजू नका. वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमनच मला सोडत नाही. आपण खेडेगावातली माणसं आहोत, आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो त्यांचा औषध पाणी करतो, असे श्रीनिवास पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srinivas pawar oppose ajit pawar and goes with sharad pawar said every relationship has expiry date scj