गेल्या वर्षभराहून अधिक काळ महाराष्ट्रात शिवसेनेतील पक्षफुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. कायदेशीर लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालही राज्यानं पाहिला. आता तशाच काहीशा घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबतही घडू लागल्या आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांना लक्ष्य केलं जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या सगळ्या घडामोडींच्या मागे दिल्लीचा अदृष्य हात असल्याचा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडतंय?

आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, चार महिन्यांनंतरही त्यावर निर्णय न झाल्यामुळे ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं. त्यानंतर दोनच दिवसांत विधानसभा अध्यक्ष दिल्लीत दाखल झाले. कायदेतज्ज्ञांशी आपण चर्चा केल्याचं राहुल नार्वेकर माध्यमांना म्हणाले. तसेच, सोमवारपासून या प्रकरणाची सुनावणी लावल्याचंही समोर आलं आहे.

राहुल नार्वेकर दिल्लीहून परत आल्यानंतर अजित पवार गटानंही शरद पवार गटाविरोधात अपात्रतेचं पत्र अध्यक्षांना सोपवलं आहे. शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदारांना अपात्र करण्यात यावं, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. या संदर्भात आता सुप्रिया सुळेंनी भाजपा व अजित पवार गटाला लक्ष्य केलं आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळेंनी यावेळी अजित पवार गटावर टीकास्र सोडलं. “निवडणूक आयोगाला आमच्यातल्या काही घटकांनी पत्र लिहिलं आहे, आम्ही नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख ही फक्त शरद पवार आहेत. ८३ वर्षांच्या माणसानं स्वत:च्या हिंमतीवर शून्यातून राजकारण सुरू केलं. त्यांनी स्वत:च्या हिंमतवर काढलेल्या पक्षातून त्यांनाच काढण्याचं पाप केलं जातंय. ज्यांना आपण वडिलांच्या जागेवर ठेवतो, ज्यांना विठ्ठलाच्या जागेवर ठेवल्याची भाषणं हे करतात, त्यांनाच त्यांच्याच घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी कानावर येत आहेत. ही कोणती संस्कृती यांनी काढली आहे?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.

सुप्रिया सुळेंचं ‘ते’ विधान अजित पवारांसाठी नव्हतं? स्वत:च स्पष्टीकरण देत म्हणाल्या…

“आजपर्यंत मराठी व भारतीय संस्कृतीत मुलगा आई-वडिलांसाठी घर बांधतो, आई-वडिलांची सेवा करतो. मोठा भाऊ घरात राहिला तर धाकटा भाऊ सोयीसाठी म्हणून दुसरं घर करतो. समोर येणारी ही नवी संस्कृती दुर्दैवी आहे. पण ही संस्कृती राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. दिल्लीवरून एक अदृश्य हात आहे. तो सातत्याने हे कट-कारस्थान महाराष्ट्राच्या विरोधात करत आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्कार नाहीत”, असं त्या म्हणाल्या.

“हे दोन्ही पक्ष भाजपाला जड जात आहेत”

“महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष दिल्लीला जातात आणि ही नोटीस वगैरे दिली जाते. हा खरंच योगायोग असू शकतो का की दिल्लीला विधानसभा अध्यक्ष जातात आणि त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक सोडून गेलेला घटक काहीतरी पावलं उचलतो. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष हा टिकताच कामा नये असं कारस्थान चालू आहे. पण हे दोन्ही पक्ष या अदृश्य हाताला जड जात आहेत. कदाचित त्यामागे भाजपा असू शकते. ही भाजपाची असुरक्षितता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राविरोधात हे कटकारस्थान चालू आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule slams bjp ajit pawar faction on assembly speaker notice pmw