Devendra Fadnavis : राज्यात तीन प्रमुख पक्षांचं महायुतीचं सरकार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते राज्याच्या महत्त्वाच्या खुर्चीवर विराजमान आहेत. त्यामुळे विविध विचारधारा असलेल्या तिन्ही पक्षातील या तिन्ही नेत्यांना एकमेकांशी डील करणं कठीण जातं असेल का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातो. हाच प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल शब्दांत उत्तर दिलं आहे. ते ‘मुंबई टेक वीक २०२५’मध्ये ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर संवाद साधत होते. यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुती सरकारमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून होते, अशी चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होण्यास वेळ लागला. अखेर ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीचे आमदार एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार झाले. तर, बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवारांच्याही गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली. यानिमित्ताने राज्याला पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले.

दरम्यान, दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाशी डील करणं जास्त अवघड असतं असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने विचारण्यात येतो. तोच प्रश्न आजही त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी अत्यंत मिश्किल शब्दांत उत्तर दिलं.

ठाण्यातील की बारामतीतील लोकांबरोबर डील करणं अवघड जातं? असा प्रश्न त्यांना आज विचारण्यात आला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस हसत म्हणाले, “हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. मी सर्वांशी डील करू शकतो. पण त्यांना माझ्याशी डील करता येतंय का हे विचारावं लागेल. मी ठाणे, बारामती आणि इतर कोणाशीही डील करू शकतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane or baramati who is difficult to deal with devendra fadnavis answer sgk