अलिबाग – गौरीगणपतींचा सण साजराकरून परतणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचे विघ्न आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे गुरुवारी पहायला मिळाले. दहा मिनटाचे अंतर पार करण्यासाठी तासभराचा कालावधी लागत होते. बेशिस्त वाहनचालक या समस्येत अधिकच भर घालत होते.

माणगाव ते गारळ परिसरातील सात ते आठ किलोमीटर परिसरात वाहनांचा लांबच लांब रांगा होत्या, तर इंदापूर ते कशेने या तीन ते साडेतीन किलोमीटर परिसरात वाहतूक कोंडी होती. त्यामुळे वाहतुकीचा खोंळबा झाला होता. बेशिस्त वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने पोलीसांना वाहतूक नियमन करणे कठीण होत होते.

सकाळच्या सत्रात वडखळ ते पनवेल दरम्यान वाशी नाका, रामवाडी, भोगावती नदीवरील पूल परिसर आणि हमरापूर, पळस्पे परिसरात वाहतूक धिम्यागतीने सरू होती. अवजड वाहने वाहतुक कोंडीत भर घालत होती. दुचाकीआणि तीनचाकी वाहने मोठ्या प्रमाणात महामार्गावर आली होती. दुपार नंतर वाहनांची संख्या घटल्याने, वडखळ ते पनवेल दरम्यानची वाहतुक सुटण्यास मदत झाली. मात्र माणगाव आणि इंदापूरची कोंडी संध्याकाळी उशीरा पर्यंत कायम होती.

पावसाचाही व्यत्यय

रायगड जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे दृश्यमानता कमी असल्यानेही महामार्गावरील वाहनांचा वेग काही प्रमाणात मंदावला होता. पोलीसांकडून वाहतूक नियमनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते.