Uddhav Thackeray : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केल्याचं दिसून येत आहे. या अनुषंगानेच आज मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा अप्रत्यक्ष अॅनाकोंडा असा उल्लेख केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आज भाजपा असेल किंवा मिंदे असेल, त्यांच्याकडे पैसे असतील, पण जीवाला जीव देणारे माणसं नाहीत. त्या दिवशी आपला या ठिकाणी मेळावा पार पडला, पण तेव्हा नेमकं पाऊस होता, त्यामुळे काही जण माझ्या फटक्यातून (टीका) वाचले, अन्यथा आणखी फटकवणार (टीका करणार होतो) होतो”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“आज आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळांबाबत जे काही सादरीकरण केलं आहे, आपल्याला त्यामध्ये आणखी खोलवर जायचं आहे, हे काम महाराष्ट्रभर करायचं आहे, पण याची सुरुवात मुंबईपासून करायची आहे. कारण मुंबईवर कोणाचा डोळा आहे हे तुम्हाला माहिती आहे. खासकरून दोन व्यापाऱ्यांचा मुंबईवर डोळा आहे. तुमच्या मनातील नावं मला माहिती आहेत, पण ते मी आता माईकमध्ये घेत नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली.
उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांचा अप्रत्यक्ष अॅनाकोंडा असा उल्लेख
“आज एकजण मुंबईत येऊन गेले. योगायोग म्हणजे आज मी सामनामध्ये दोन बातम्या वाचल्या. पहिल्या पानावर भाजपा कार्यालयाचं उद्धघाटन आणि दुसऱ्या पानावर एक बातमी होती, त्यामध्ये जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार, आता आपण पेंग्विन आणलं म्हणून लाखो पर्यटक तिकडे वाढले आणि मला त्याचा अभिमान आहे. पण पेंग्विनच्या उंचीची काही माणसे आपल्यावर टीका करतात ते सोडून द्या. पण अॅनाकोंडा म्हणजे सर्व काही गिळणारा साप होय आणि तो आज इकडे येऊन भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. मुंबई गिळायची का? पाहतो कशी गिळणार ते. नाही पोट फाडून बाहेर आलो तर नाव सांगणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“बरं भूमिपूजन करायला आला आहात तर भूमिपूजन करा, डोक्यावर नारळ फोडा किंवा दगडावर. कुठेही फोडा एकच आहे. मात्र, भूमिपूजन करतानाही घराणेशाहीवर टीका करता. मग तिकडे त्यांचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते त्याच्या क्रेडिटने झालं का? मग घराणेशाही कोणाची ठाकरेंची? आरे उभा राहून दाखवा समोर, त्या अब्दालीला सांगायचंय आमच्या आई-वडिलांचे ऋण मानणारे पाईक आम्ही आहोत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.
