सावंतवाडी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती झाली पाहिजे, या माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत. युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही, मात्र युती झाली नाही तर शिंदे सेना म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढून या जिल्ह्यात भगवा फडकवू, असे मत राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) संपर्कमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राणेंच्या भूमिकेचे समर्थन त्यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीबाबत खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत युती झाली पाहिजे असे सुतोवाच केले होते. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना राजकारणात खूप अनुभव आहे. “राणेंना विचारून पाऊल टाका” असे नेते व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे ते जे काही बोलतात त्याला खूप महत्त्व आहे.
“राणे यांनी महायुतीने पुढे गेले पाहिजे असे सांगितले आहे. युती व्हावी ही राणे यांची भूमिका आहे आणि आमचीही समन्वयातून युती व्हावी अशीच भूमिका आहे.” “युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही, असे सर्वांनी करावे” असे आवाहन सामंत यांनी केले. युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. युती व्हावी ही समन्वयाची भूमिका असली तरी, जर तसे घडले नाही तर “मग शिवसेना म्हणून लढणार” आणि या जिल्ह्यात भगवा फडकवणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
उद्धव सेनेसोबत युती नाही!
कणकवली नगरपंचायतीमध्ये शिवसेना (शिंदे गट), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व शहर विकास आघाडी बरोबर एकत्र होत निवडणुकीत उतरणार, या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना सामंत यांनी सांगितले की, या चर्चेत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून शिवसेना (शिंदे गट) कधीही उद्धव सेनेबरोबर युती करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक होऊन महायुती झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. माजी आमदार राजन तेली यांच्या बाबत राणे यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रतिक्रिया देताना सामंत यांनी सांगितले की, माजी आमदार राजन तेली हे महायुतीमध्ये कुठेही अडसर ठरणार नाहीत. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “ठाकरे यांच्याकडे आता कोण कार्यकर्ते राहिले नाहीत, त्यामुळे ते आता मतदार यादी तपासत बसले आहेत, अगोदर कधी मतदार यादी त्यांनी तपासली नव्हती.” जे व्होटबंदी करायला सांगत आहेत त्यांचे कोणीही ऐकणार नाही, असा टोलाही सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
