Uddhav Thackeray On CM Devendra Fadanvis : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे पदाधिकाऱ्यांच्या निर्धार शिबीरादरम्यान आज भाजपा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना स्थगिती दिल्याच्या मु्द्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “२०१२ साली आपण फक्त दोन शब्दांवर मुंबई जिंकली होती, ‘करून दाखवलं’, २०१७ ला पण तेच केलं. देवेंद्र फडणवीस यांना म्हणावं कोस्टल रोड हे कर्तृत्व तुमचं नाहीये, माझ्या शिवसेनेचं आहे. त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे. शिवडी नावाचा जो लिंक रोड आहे तो सुद्धा जरी तुम्ही सुरू केला असला तरी त्याचा पहिला गर्डर मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या हाताने टाकलेला आहे.”
“करोना काळात मी काम बंद पडू दिलं नव्हतं. मेट्रोची कामे मी बंद पडू दिली नव्हती. कोस्टल रोडचं काम बंद पडू दिलं नव्हतं. रुग्णालयात देखील ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सेवा सुविधा आम्ही महाराष्ट्राला उपलब्ध करून दिल्या होत्या. फक्त तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून मी उद्धव ठाकरे नाही… तुम्ही उद्धव ठाकरे नाहीच आहात आणि होऊ शकतच नाहीत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही लढाई पक्षाची लढाई नाही. ही लढाई राजकीय लढाई नाही. ही आपल्या मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई – #LIVE | पदाधिकारी व शिवसैनिकांचे निर्धार शिबीर | UddhavSaheb Thackeray | कालिदास नाट्यगृह, मुलुंड पश्चिम https://t.co/jEAASfYbv0
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 9, 2025
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना स्थगिती दिल्याची व त्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी सुरू करण्यात आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. याबद्दल फडणवीस म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून माध्यमांची एक आवडती बातमी झाली आहे. काही झालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या कामांना स्थगिती दिली. पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की, कामांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “याआधीही मी स्पष्ट केलं आहे की जे राज्याच्या हिताचं आहे ते काम सुरु करत असताना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी देखील होतो, त्यानंतर अजित पवार हे देखील आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे निर्णय घेतले, त्या निर्णयांची जबाबदारी फक्त एकनाथ शिंदे यांची नाही, तर आमच्या तिघांचीही जबाबदारी आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
© IE Online Media Services (P) Ltd