मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या केलेल्या बदनामीचे तीव्र पडसाद गुरूवारी विधिमंडळात उमटले. सत्ताधारी भाजप-शिवसेना सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गांधी यांच्याविरोधात जोरदार निरदर्शने करीत जोडेमारो आंदोलन केले. तसेच विधानसभेतही गांधी यांनी सावरकर आणि देशाची माफी मागावी अशी मागणी करीत सभागृहाचे कामकाज रोखले. तर एकाद्या पक्षाच्या नेत्याविरोधात विधानभवनाच्या आवारात जोडेमारो आंदोलन करणे ही राज्याची संस्कृती नाही असे सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल वाद्ग्रस्त वक्तव्य केली होती. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गांधी यांच्या विरोधात निदर्शने केली. राहुल गांधी यांनी सावकरांचा अवमान केला असून माफी मागावी अशी मागणी करीत या आमदारांनी गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. त्यानंतर सभागृहातही सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब झाले. शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट यांनी हा मुद्दा उपस्थित करताना, राहुल गांधी यांनी सावरकर आणि देशाचा अवमान केल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप सदस्यांनीही आक्रमक होत राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

नेत्याच्या प्रतिमेला विधान भवनाच्या आवारात जोडेमार करण्याचे आंदोलन ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध केला. रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा – त्याचा प्रश्न असतो परंतु विधिमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशी मागणी पवार यांनी केली. तुम्हाला तुमच्या नेत्यांचा अभिमान आहे तसा आम्हालाही आमच्या नेत्यांचा अभिमान आहे. अशी जोडे मारण्याची पध्दत विधीमंडळ आवारात सुरू झाली तर ती कुणालाच आवडणार नाही आणि आम्हालाही ते पटणार नाही असेही अजित पवार यांनी सरकारला सुनावले. अशाप्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधीमंडळाच्या परिसरात घडू नये यासाठी विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी तातडीने पाऊले उचलावीत अशी मागणी पवार यांनी केली. तर विधिमंडळाच्या आवारात पक्षाच्या नेत्यांविरोधात जोडेमारो चा प्रकार कधीही घडला नाही. उद्या तुमच्या नेत्यांच्याबाबही असे घडू शकते असा इशारा देत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र पड़णवीस यांनीही विरोधकांच्या भूमिकेशी सहमती दर्शवित असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची काळजी घेतला जाईल असे सांगितले. मात्र सावरकरांबद्दल अपमानजनक बोलणे काँग्रेसच्या नेत्यांनी प्रथम बोलणे बंद केले पाहिजे असेही विरोधकांना सुनावले. तर विधिमंडळाच्या पारऱ्यांवर घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल. तसेच विधिमंडळाच्या आवारात कोणतेही असंसदीय कामकाज होणार नाही याची सर्वानी दक्षता घ्यावी अशी ताकिद विधानसभा अध्यम्क्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

धडा शिकविणार- काँग्रेस

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आघाडीवर असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना धडा शिकविण्यात येईल, असे काँगेसच्या एका नेत्याने सांगितले. भाजपच्या सफाईची कामे करणाऱ्या आमदाराला ‘प्रसाद’ देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. या आमदाराचे कारनामेही उघड करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

काँग्रेसचे भाजपविरोधात आंदोलन; न्यायालयीन निकालाचे पडसाद

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना एका मानहानी प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याच्या सुरत न्यायालयाच्या निकालाचे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात व अधिवेशनाच्या बाहेरही तीव्र पडसाद उमटले. राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप करीत काँग्रसतर्फे भाजप सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. भाजपच्या दडपशाहीला रस्त्यावर उतरून चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला.

आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

या वेळी पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. 

िंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन ; संयुक्त सभेच्या तयारीसाठी आज बैठक

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर संभांना सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पहिल्याच सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज, शुक्रवारी विधान भवनात आघाडीचे प्रमुख नेते, आमदार यांची बैठक होणार आहे.

शेतकऱ्यांच्या समस्यांबरोबरच, वाढती बेरोजगारी, महागाई या प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व शिवसेना या तीन प्रमुख पक्षांच्या एप्रिल ते जूून या कालावधीत विभागवार संयुक्त जाहीर सभा घेण्याचे ठरले आहे. पहिली सभा २ एप्रिलला संभाजीनगर येथे होणार आहे. पहिलीच सभा प्रचंड मोठी करायची, त्यादृष्टीने आघाडीच्या नेत्यांची तयारी सुरूआहे. विधान भवनात या संदर्भात उद्या शुक्रवारी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. संभाजीनगर येथील सभेला तिन्ही पक्षांचे सर्व प्रमुख नेते, आमदार व खासदार यांची उपस्थिती अनिवार्य केली जाणार आहे. सभेच्या तयारीची जबाबदारीही सोपविण्यात येणार आहे. पहिल्याच सभेद शक्तिप्रदर्शन करण्याचा आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टीने बैठकीत नियोजन केले जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uproar in maharashtra assembly over rahul gandhi remarks on savarkar zws