लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाल्यानंर राजकीय पक्ष आणि पुढारी प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे एकमेकांच्याविरोधात टीका-टिप्पणीला जोर आला आहे. महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाला झुकते माप घ्यावे लागले. त्यांनी जाहीर केलेल्या एका उमेदवाराला ऐनवेळी मागे घ्यावे लागले तर यवतमाळच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट करण्यात आला. यामुळे शिंदे गटावर महाविकास आघाडीतर्फे टीका होत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. ‘ना घर का ना घाट का’, अशी शिंदे गटाची अवस्था झाल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

शिंदे गटावर टीका करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘ना घर का ना घाट का’, अशी वेळ शिंदे गटावर आली आहे. उद्धव ठाकरे भेटत नाही, अशी सबब सांगून शिंदे गट बाहेर पडला. पण आता त्यांना लोकसभेचे मतदारसंघही भेटत नाहीत, हे सर्वच पाहतायत. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे नेते खासगीत ही बाब बोलून दाखवितात. याचाच अर्थ असा आहे की, विरोधक गोंधळलेले आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गटात अस्वस्थतता असून उमेदवार निवडीसंदर्भात त्यांची दमछाक होत आहे. या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात तरी महायुतीचा विजय रथ रोखेल.

३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

विदर्भात काँग्रेसला अनुकूल वातावरण

विदर्भात काँग्रेसला अनुकूल असे वातावरण आहे. काँग्रेसचा पाचही जागांवर विजय होईल. लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांबाबत प्रचंड नाराजी आहे. स्वतंत्र भारतात आपण गुलाम होऊ, अशी भीती लोकांना वाटत आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढायचे, असे लोकांनी ठरविले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी यांची विदर्भात जाहीर सभा होणार आहे. विदर्भातील लोकांचा पाठिंबा या सभेला मिळेल. राहुल गांधी यांनी त्याग आणि संघर्ष सुरू केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याबद्दल एक वेगळे वातावरण सामान्य जनतेमध्ये निर्माण झाले आहे. त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होईलच. तसेच पाचही लोकसभा मतदारसंघात या सभेमुळे एक परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे दिसेल.

‘आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय’, संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा

सांगलीचा विषय आता संपला

सांगलीच्या जागेबाबत आता वाद घालण्यात अर्थ नाही, असे सांगताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सांगली मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचा दावा होता. पण आता आम्ही हा विषय ताणून धरणार नाही. आमचे पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेणार आहे. त्यानुसार आम्ही काम करू. परंपरागत जागा दुसऱ्या पक्षाला गेल्यानंतर सुरुवातीला थोडी नाराजी असते. पण ती दूर करण्याचा प्रयत्न करू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar slams eknath shinde says his faction mla touch with ubt shiv sena kvg