Sunil Tatkare On Suraj Chavan : छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर अवघ्या महिन्याभरातच सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचं पत्र खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळांसह आदी नेत्यांनी दिलं. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून देण्यात आली. दरम्यान, सूरज चव्हाण यांचं अवघ्या एका महिन्यात राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याने विरोधकांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. यानंतर आता सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देत हा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीचा असल्याचं म्हटलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले की, “असं आहे की जी मारहाणीची घटना घडली, ती घटना कशामुळे घडली? याबाबतच्या प्रतिक्रिया मी घटना घडली तेव्हा दिलेल्या आहेत. घडलेल्या घटनेबाबत मी निषेध व्यक्त केलेला आहे. तसेच मारहाणीच्या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकारिणीने सूरज चव्हाण यांच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देखील घेतला. शेवटी घडलेल्या घटनेबाबत सूरज चव्हाण यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिली”, असं सुनील तटकरे म्हणाले.
“गेल्या अनेक वर्षांपासून सूरज चव्हाण हे पक्ष संघटनेत काम करतात. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कोअर कमिटीने सूरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी विचारपूर्वक दिलेली आहे. आता प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, तसंच प्रत्येक पक्षाला ज्याचा त्याचा निर्णय घेण्याचाही अधिकार असतो. पक्षाच्या कोअर कमिटीने योग्य तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांची नियुक्ती झालेली आहे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं घटना काय घडली होती?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे २० जुलै रोजी लातूर दौऱ्यावर असताना अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन दिलं. तसेच त्यांच्यावर पत्ते उधळले होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व मारहाण करणारे राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांच्यावर टीका झाली होती. यानंतर चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, “आम्ही छावा संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसज दूर करू. छावा संघटनेच्या प्रतिनिधींनी निवेदन देताना काही असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे माझ्याकडून व आमच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली.”
सूरज चव्हाणांनी व्यक्त केली होती दिलगिरी
सूरज चव्हाण म्हणाले होते की, “शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या छावा संघटनेच्या प्रतिनिधींना आम्ही मारहाण केल्याचा दावा प्रसारमाध्यामांवर केला जात आहे. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी प्रश्नावर कोणी आवाज उठवत असेल तर त्याच्या पाठिशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. मात्र, तिथे आमच्या नेतृत्त्वाबद्दल असंवैधानिक शब्द वापरले गेले होते. त्यामुळे आमच्याकडून तशी कृती (मारहाण) झाली. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.