अभिनेता सनी देओलने एकदा त्याचे वडील धर्मेंद्र यांचा इंटिमेट सीन दाखवल्याबद्दल एका दिग्दर्शकाला बेदम मारहाण केली होती. अलीकडेच ‘दबंग’चे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
अनुराग कश्यपचा भाऊ आणि दिग्दर्शक अभिनव कश्यप सध्या चर्चेत आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत त्याने ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आणि त्याचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता एका मुलाखतीत त्याने सनी देओलने एका दिग्दर्शकाला मारहाण केल्याबद्दलही बोलले आहे.
बॉलीवूड ठिकानाशी बोलताना अभिनवने सांगितले की, जेव्हा त्यांनी दबंग बनवायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला सर्वकाही सहमतीने झाले होते. अभिनवने ओम पुरी आणि अनुपम खेर यांना कास्ट केले. जेव्हा धर्मेंद्र यांच्याबरोबर काही जमले नाही तेव्हा त्याने विनोद खन्ना यांना कास्ट केले. धर्मेंद्र यांना का कास्ट केलं नाही यावर अभिनव म्हणाला, “मी त्यांना भेटलो आणि त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, ‘बेटा, भूमिका मजबूत असेल तरच मला कास्ट कर, नाहीतर मला कास्ट करू नको.’ त्यावेळी अशी चर्चा होती की सनी देओलने कांती शाहला मारले, कारण त्याने धर्मेंद्र यांना एक इंटिमेट सीन करायला लावला होता, मला भीती वाटली.”
वृत्तानुसार, जेव्हा धर्मेंद्र यांची कारकीर्द चांगली चालली नव्हती, तेव्हा त्यांनी कांती शाहबरोबर एका चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात कांती शाहने धर्मेंद्र यांच्याबरोबर हृदयविकाराचा झटका येण्याचा सीन शूट केला होता, परंतु जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो एक इंटिमेट सीन असल्याचे दिसून आले. धर्मेंद्र यांनी प्रत्यक्षात हा सीन शूट केला नव्हता; त्यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला होता. असे म्हटले जाते की, यामुळे संतापलेल्या सनी देओलने कांती शाहला मारहाण केली होती.
सनी देओल सोशल मीडियावर फार सक्रिय नसला तरी गेल्या दोन-तीन वर्षात तो त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला. गेली एक दोन वर्षे देओल कुटुंबासाठी चांगली गेली. सनी देओल आणि बॉबी देओल या दोघांच्याही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
