१९९२ मध्ये अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी अभिनीत ‘खुदा गवाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम रचला. या दोन्ही कलाकारांची जोडी सर्वांना आवडली. फार कमी लोकांना माहीत आहे की, हा चित्रपट सेटवर नव्हे, तर अफगाणिस्तानातील एका वास्तविक युद्ध क्षेत्रात चित्रित करण्यात आला होता. पण, अमिताभ यांची आई तेजी बच्चन यांनी या चित्रपटाच्या शूटिंगबाबत निर्मात्यांना इशारा दिला होता.
चित्रपटाचे निर्माते मनोज देसाई यांनी अलीकडेच खुलासा केला की, अफगाणिस्तानला जाण्यापूर्वी अमिताभ आणि श्रीदेवी यांची आई त्यांच्या मुलांना पाठविण्याबाबत घाबरत होत्या. मनोज देसाई म्हणाले, “जेव्हा आम्ही अफगाणिस्तानला जाण्याची तयारी करीत होतो, तेव्हा श्रीदेवी यांच्या आईनं मला सांगितलं, ‘मनोजजी, जर माझ्या मुलीला काही झालं, तर परत येऊ नकोस. नाही तर मी तुला मारून टाकेन.’ तसेच तेजी बच्चन म्हणाल्या, ‘जर मुन्नाला (अमिताभ) काहीही झालं आणि जर जयानं पांढरी साडी नेसली, तर तूही आत्महत्या करशील आणि तुझी पत्नीही पांढरी साडी नेसेल.” मनोज देसाई म्हणाले की, हे शब्द रागातून बोलले गेले नव्हते, तर आईच्या भीतीतून आणि प्रेमातून बोलले गेले होते.
अमिताभ बच्चन व जया बच्चन हे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सातत्याने चर्चेत राहणारे जोडपे आहे. जया बच्चन अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात; तर अमिताभ बच्चन ब्लॉगच्या माध्यमातून त्यांचे विचार चाहत्यांपर्यंत पोहोचवतात.
जया व अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीतच अमिताभ बच्चन यांचा जया बच्चन यांच्यावर प्रभाव पडला होता. मात्र, अमिताभ बच्चन १९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘नजर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जया यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर १९७३ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन व अभिनेत्री जया भादुरी यांचे लग्न खूप साधेपणाने झाले होते.
दरम्यान अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या ब्लॉगमधून व्यक्त होताना दिसतात. आगामी काळात ते कोणत्या चित्रपटात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.