Amruta Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होत असतात. अमृता फडणवीस यांना गायिका म्हणून देखील ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यांची गाणी सोशल मीडियावर आणि युट्यूबवर तुफान व्हायरल होतात.
नुकतीच त्यांनी कर्ली टेल्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वर्षा बंगला, तेथील स्वयंपाक घर याची खास झलक प्रेक्षकांना दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी तुमचं मत कोणाला असेल? या प्रश्नावर अमृता यांनी नेमकं काय उत्तर दिलंय आणि त्या कुणाच्या फॅन आहेत? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…
“नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस तुमचं मत कोणाला?” यावर अमृता फडणवीस म्हणतात, “मोदीजी… मी एकाच व्यक्तीची फॅन आहे आणि ते आहेत मोदीजी! मी त्यांना भेटले आहे पण, मी त्यांच्याशी जास्त संवाद साधू शकले नाही. ते प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांची मी अगदी एका वाक्यात पटकन उत्तरं देत होते. कारण, मला खूप जास्त दडपण आलं होतं. मला घाम फुटला होता. मी त्यांची फॅन आहे.”
पुढे, त्यांना “शाहरुख खान की सलमान खान?” या दोघांपैकी एका अभिनेत्याची निवड करण्यास सांगितलं. यावर मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, “या प्रश्नाचं उत्तर देताना सध्या मी शाहरुखचं नाव घेईन. कारण, २२ नोव्हेंबरला गेटवे ऑफ इंडियाजवळ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या शोमध्ये मी आणि शाहरुख सहभागी होणार आहोत.”
दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर यावर्षी दिवाळीत त्यांचं ‘कोई बोले राम राम’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यांची गाणी सोशल मीडियावर हिट होतात. याशिवाय महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही अमृता यांच्या गाण्यांचा अल्बम प्रदर्शित झाला आहे.
