अभिनेता आमिर खान सध्या गौरी स्प्रॅटला डेट करतोय. काही महिन्यांपूर्वी आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख सर्वांना करून दिली. त्यानंतर तो व गौरी अनेक इव्हेंट्सना एकत्र हजेरी लावताना दिसत आहेत. दोन वेळा घटस्फोटित असलेल्या आमिर खानने गौरीशी तिसरं लग्न करण्याच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे.

आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गौरीने हजेरी लावली होती. गौरीने या इव्हेंटला साडी नेसली होती. आमिरने गौरीचा हात हातात घट्ट पकडून फोटोंसाठी पोज दिल्या होत्या. गौरी व आमिर अनेकदा विमानतळावरही एकत्र दिसतात. दोघेही फिरायला जातानाही पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असतात. आता आमिरला गौरीशी लग्न करण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मनात तिच्याशी लग्न केलंय, असं तो म्हणाला.

‘तू पुन्हा प्रेमात पडला आहेस, तर तू गौरी स्प्रॅटशी लग्न करण्याचा विचार करत आहेस का? सध्या तुमच्या नात्याची स्थिती काय आहे?’ असे प्रश्न आमिर खानला विचारण्यात आले. त्यावर आमिर म्हणाला, “गौरी आणि मी एकमेकांबद्दल खरोखरच खूप गंभीर आहोत आणि आम्ही कमिटेड आहोत. आम्ही पार्टनर्स आहोत. आम्ही एकत्र आहोत. लग्न ही एक वेगळी गोष्ट आहे. खरं तर माझ्या मनात मी तिच्याशी आधीच लग्न केलं आहे. मग ते औपचारिक करायचं की नाही हे मी पुढे ठरवेन.”

कोण आहे गौरी स्प्रॅट?

Who is Gauri Spratt :आमिर खान व गौरी एकमेकांना गेल्या दीड वर्षांपासून डेट करत आहेत. गौरी मूळची बेंगळुरूची आहे. ती सध्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. गौरीला एक मुलगा असून तो सहा वर्षांचा आहे. गौरी ही तमिळ व आयरिश आहे. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरीने आमिरचे ‘दंगल’ व ‘लगान’ हेच चित्रपट पाहिले आहेत. आमिरने प्रेमाची कबुली देताना गौरीबरोबर आनंदी असल्याचं म्हटलं होतं.

गौरी स्प्रॅट व आमिर खान (फोटो – सोशल मीडिया)

आमिर खान गौरीला २५ वर्षांपासून ओळखतो आणि आता ते रिलेशनशिपमध्ये आहेत. आमिर खान त्याच्या या नव्या व तिसऱ्या नात्याबाबत खूप गंभीर आहे. आमिरने गौरीची ओळख सलमान खान, शाहरुख खान तसेच आपल्या कुटुंबाला करून दिली आहे.

आमिर खानचे दोन घटस्फोट

आमिर खान दोन वेळा घटस्फोटित आहे. त्याने पहिलं लग्न १९८६ मध्ये रीना दत्ताशी केलं होतं. या जोडप्याला जुनैद खान व आयरा खान ही दोन अपत्ये आहेत. या दोघांचा घटस्फोट २००२ मध्ये झाला. आमिरने दुसरे लग्न किरण रावशी २००५ मध्ये केले होते. दुसऱ्या लग्नापासून त्याला १२ वर्षांचा मुलगा आझाद आहे. आमिर व किरण यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला होता.