अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच तो ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिषेक बच्चनने ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावली. हा शो त्याचे वडील म्हणजेच अमिताभ बच्चन वर्षानुवर्षे होस्ट करत आहेत. ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाचा दिग्दर्शक शुजित सरकारनेदेखील या शोमध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या शोमध्ये अभिषेक बच्चनने त्याची मुलगी आराध्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक बच्चनने काय म्हटले?

‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये बिग बींनी अभिषेकला हा चित्रपट निवडण्याचे कारण विचारले. त्यावर बोलताना अभिषेकने, “मी मुलीचा बाप आहे. मी आराध्याचा पिता आहे आणि मला त्या भावना समजतात”, असे म्हणत अभिनेत्याने चित्रपट निवडण्यापाठीमागे असलेल्या
अनेक कारणांपैकी हे एक कारण असल्याचे म्हटले आहे.

त्याविषयी अधिक बोलताना अभिषेकने म्हटले, “एक दिवस शुजित सरकार यांनी मला कॉल केला आणि म्हणाले की, माझ्याकडे एका चित्रपटाचे कथानक आहे. तुम्हाला ते आवडले, तर आपण त्यावर काम करू. त्यांनी मला संपूर्ण कथा सांगितली नाही. मला फक्त अर्जुन सेनच्या पात्राबद्दल सांगितले. ते मला म्हणाले की, मला अशा एका माणसावर चित्रपट बनवायचा आहे, ज्याला डॉक्टरांनी सांगितले आहे की, त्याच्याकडे फक्त १०० दिवस आहेत. सहसा अशा परिस्थितीत लोक नैराश्यात जातात; परंतु हा माणूस इतका उत्साही होता की, त्याने ते अत्यंत सकारात्मकतेने घेतले. आज मी काय साध्य करणार, या विचाराने तो रोज उठायचा. त्यामुळे मला ती कथा आवडली.”

पुढे अभिनेत्याने म्हटले, “चित्रपटाचे कथानक आवडण्याबरोबरच मला आणखी एक गोष्ट आवडली की, ही कथा एका वडिलांच्या दृष्टिकोनातूनही सांगितली जाणार आहे. एक बाप सांगतो की, मी सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करून मुलीसाठी जगणार आहे. ही गोष्ट खूप प्रेरणादायी होती. मी आराध्याचा पिता आहे. शुजित सरकारला दोन सुंदर मुली आहेत, आपण सगळेच मुलींचे वडील आहोत. त्यामुळे आपण त्या भावना समजू शकतो. या चित्रपटाला होकार देण्यासाठी हे कारण पुरेसे होते. हा चित्रपट करण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळे मी खूप आनंदित आहे. कारण- यामध्ये वडिलांच्या दृष्टिकोनातून गोष्ट सांगितली गेली आहे. लोक बऱ्याचदा आई आणि मुलाचे नाते, त्यांच्यातील बॉण्डिंगविषयी बोलतात; परंतु बाप आपल्या मुलांसाठी काय करतो, याबद्दल कोणीही फारसे बोलत नाही. कारण- वडील जे काही करतात, ते शांतपणे करतात.”

स्वत:च्या वडिलांबद्दल बोलताना अभिषेक बच्चनने म्हटले, “माझे वडील सकाळी ६.३० ला घरातून निघतात. आम्ही उशिरा उठतो. हेच मुलांसाठी वडिलांनी शांततेने केलेले कष्ट असतात. आज आम्ही सगळे मोठे झालो आहोत. आम्हाला आमची मुलं आहेत. तरीसुद्धा माझे वडील कष्ट करतात.”

हेही वाचा: Video: श्रद्धा कपूरच्या गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेनेच्या लावणीचा ठसका; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “कडक…”

दरम्यान, ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली असली तरीही अभिषेक बच्चनचे त्याच्या अभिनयासाठी कौतुक होताना दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून होताना दिसत आहेत. मात्र, ऐश्वर्या किंवा अभिषेक यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan said i am aaradhyas father proudly calls himself girl dad she is reason behind he said yes to the film i want to talk nsp