Actress Maadhavi Shares Experience Of Working With Amitabh Bachchan: अभिनेत्री माधवी यांनी आजवर हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांतील चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरदेखील काम केले आहे.

त्यावेळी मला आश्चर्य वाटले…

माधवी यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’, ‘अग्निपथ’ या चित्रपटांत काम केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी बिग बींबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता. जेव्हा अंधा कानून या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले, त्यावेळी माधवी इंडस्ट्रीमध्ये नवीन होत्या. मात्र, अभिताभ बच्चन यांना कामाचा चांगला अनुभव होता. त्यांना त्यादरम्यान मोठी लोकप्रियता मिळत होती.

तरीदेखील अमिताभ बच्चन यांनी माधवी यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्यास होकार दिला होता. त्याबद्दल माधवी म्हणालेल्या, “जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर ‘अंधा कानून’मध्ये काम करण्यास होकार दिला, त्यावेळी मला आश्चर्य वाटले होते. कारण- मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते आणि ते सुपरस्टार होते.

अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करताना माधवी म्हणाल्या, “ते जे काही करतात, ते मनापासून करतात. जर एखादा छोटा सीन असेल, तर जास्त कष्ट घ्यायचे नाहीत, अशी आपली मानसिकता असते. पण, जेव्हा अमितजी काम करतात, तेव्हा सीन कितीही छोटा असला तरीही त्यांच्यासाठी तो इतर मोठ्या सीनइतकाच महत्त्वाचा असतो.”

बिग बी यांनी डबिंगचे महत्त्व कसे पटवून दिले, यावर बोलताना माधवी म्हणाल्या, “डबिंग हा अभिनयाचाच भाग असल्याचे मला वाटत होते. मात्र, मी जेव्हा अमितजींना डबिंग करताना पाहिले, तेव्हा मला याची जाणीव झाली की, डबिंग करताना आपला परफॉर्मन्स सुधारला जाऊ शकतो. जेव्हा मी अंधा कानून या चित्रपटाच्या डबिंगसाठी गेले, तेव्हा अमितजी आधीपासून डबिंग करीत होते. ते ज्या पद्धतीने डबिंग करीत होते, ते अविश्वसनीय होते. आज जर मी योग्य रीत्या बोलू शकत असेल किंवा आवाजाच्या मॉड्युलेशनबद्दल मला काही माहीत असेल, तर ते अमितजींमुळे माहीत आहे.”

माधवी यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा असल्याचे सांगितले. माधवी म्हणाल्या की, मी सेटवर त्यांचे शांतपणे निरीक्षण करीत होते. त्यांच्याकडून केवळ अभिनयच नाही, तर इतरांशी नम्रतेने वागण्याबद्दलही शिकायला मिळाले. ते सगळ्यांना हसवायचे. जेव्हा अमितजी सेटवर असत तेव्हा वातावरण खूप उत्साही असते. त्यांनी मला किंवा इतर कोणालाही ते सुपरस्टार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही.

अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक चित्रपटांत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अँग्री यंग मॅन ही त्यांची ओळख बनली होती. वयाच्या ८२ व्या वर्षीही अमिताभ बच्चन विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. तसेच, सोशल मीडियावरदेखील अमिताभ बच्चन सक्रिय असतात. त्यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा होताना दिसते.