अभिनेता अक्षय खन्ना हा बॉलिवूडला लाभलेला एक गुणी अभिनेता आहे. त्याने ‘दिल चाहता है’मध्ये साकारलेला सिद्धार्थ अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. शांत, संयत अभिनयासाठी ओळखला जाणारा हा अभिनेता जेव्हा छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला तेव्हा अनेकांचा थरकाप उडाला. छावा चित्रपटातील औरंगजेब हा अक्षय खन्नाने जिवंत केला. त्याच्या अभिनयाचं कसब पणाला लागलं होतं हे दिसून आलं. आता अक्षय खन्ना शुक्राचार्य म्हणजेच दैत्यांच्या गुरुंची भूमिका महाकाली या चित्रपटात साकारतो आहे. महाकाली चित्रपटाचं पोस्टर समीक्षक तरण आदर्श यांनी पोस्ट केलं आहे. त्यात अक्षय खन्नाचा हटके लूक दिसून येतो आहे. ज्यानंतर आता अमिताभ बच्चन, राज कुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह इतर अभिनेत्यांनी साकारलेल्या अशा हटके लूक्सची चर्चा होते आहे.

महाकालीतल्या अक्षय खन्नाच्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा

‘महाकाली’ हा एक नवीन चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ त्याच्या कथेसाठीच खास नाही, तर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना याने या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘महाकाली’च्या बातमीने चित्रपटप्रेमींमध्ये आधीच उत्साह निर्माण झाला आहे.‘महाकाली’मध्ये राक्षसांचे गुरु शक्राचार्य यांची भूमिका अक्षय खन्ना साकारतो आहे. त्याचा हा हटके लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेता अक्षय खन्ना महाकाली या चित्रपटात दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या लूकने लक्ष वेधलंं आहे. (फोटो-तरण आदर्श, एक्स पेज)

अमिताभ यांनी कल्की चित्रपटात साकारली अश्वत्थामाची भूमिका

अभिनेता अक्षय खन्नाचं हे पोस्टर आल्यानंतर अनेकजण या पोस्टरची तुलना अमिताभ बच्चन यांनी कल्की चित्रपटात साकारलेल्या भूमिकेशी करत आहेत. अश्वत्थामा ही भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. यातला अमिताभ बच्चन यांचा लूक चर्चेत आला होता. कारण अशा प्रकारची भूमिका याआधी कुठल्याही अभिनेत्याने साकारलेली नाही. अश्वत्थामा हा महाभारतातला शापित चिरंजीव आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा पहिला लूक जेव्हा समोर आला तेव्हा अनेकांनी त्यांना ओळखलंं नव्हतं.

अमिताभ बच्चन यांनी कल्की या चित्रपटात अश्वत्थामा ही भूमिका साकारली होती. या लूकमध्ये त्यांना ओळखणंही कठीण झालं होतं. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)

अक्षय खन्नाची ‘औरंगजेब’ ही भूमिकाही गाजली

अभिनेता अक्षय खन्नाने याच वर्षी आलेल्या छावा चित्रपटात औरंगजेब हे पात्र साकारलं होतं. औरंगजेब या भूमिकेतलं क्रौर्य अक्षय खन्नाने पडद्यावर जिवंत केलं होतं. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या लूकची चर्चा झाली तशीच औरंगजेब साकारणाऱ्या अक्षय खन्नाच्या लूकचीही चर्चा झाली होती.

अक्षय खन्ना छावा या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला. औरंगजेबाचं क्रौर्य अक्षय खन्नाने या भूमिकेत जिवंत केलं होतं.

राज कुमार रावने साकारली ३२४ वर्षीय व्यक्तीची भूमिका

अभिनेता राज कुमार राव याने राबता या चित्रपटात ३२४ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली आहे. राज कुमार रावचा हा लूक काळजाचा थरका उडवणारा होता.

राज कुमार रावचा हा लूक हटके ठरला. चित्रपट फारसा चालला नाही. पण या लूकची चर्चा प्रचंड झाली. (फोटो-सोशल मीडिया)

हड्डी सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी दिसला ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत

हड्डी नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात अभिनयाचं बावनकशी सोनं असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातल्या त्याच्या लूकचीही सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.

नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याने हड्डी चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका साकारली आहे. (फोटो-फेसबुक पेज)

रणबीर कपूर जेव्हा संजय दत्तसारखा दिसतो

अभिनेता रणबीर कपूरने संजू या चित्रपटासाठी संजय दत्तचा लूक कॅरी केला होता. विशेष बाब म्हणजे संजू सिनेमात रणबीर कपूर संजय दत्तसारखा भासलाही. त्याच्या कामाचंही कौतुक झालं. तरुण संजय दत्तपासून तुरुंगातून बाहेर येईपर्यंतच्या संजय दत्तचे विविध पैलू त्या भूमिकेत होते. रणबीर कपूरने मेहनत घेऊन ही भूमिका केली.

संजू या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. (फोटो-रणबीर कपूर, इन्स्टाग्राम पेज)

रणदीप हुडाच्या सरबजीतची जोरदार चर्चा झाली

अभिनेता रणदीप हुडाने साकारलेल्या सरबजीतचीही जोरदार चर्चा झाली होती. सरबजीतच्या भूमिकेत रणदीप हुडा होता. या भूमेकासाठी त्याने ३० किलो वजन कमी केलं होतं.

रणदीप हुडा सरबजीत चित्रपटातील एका दृश्यात. त्याने या भूमिकेसाठी ३० किलो वजन कमी केलं होतं. (फोटो-रणदीप हुडा फेसबुक पेज)

आपण या सगळ्या भूमिकांकडे पाहिलं तर लक्षात येतं की चित्रपटांमध्ये या सगळ्याच अभिनेत्यांनी हटके लूक केले. त्यांची चर्चाही झाली. आता प्रतीक्षा आहे ती अक्षय खन्नाच्या महाकाली या चित्रपटाची. शुक्राचार्यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना कसे रंग भरणार हे पाहणं रंजक असणार आहे.