Alia Bhatt’s Anti Drugs Video:आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अगदी पहिल्या चित्रपटापासून तिने तिची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत असते. आता मात्र आलिया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चंदीगड विभागाने आलिया भट्टचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये आलियाने ड्रग्जला नाही म्हणा आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला त्यांच्या मिशनमध्ये पाठिंबा द्या असा संदेश दिला होता.

हा व्हिडीओ ६८० वेळा शेअर केला आहे; तर १.१ मिलियनहून अधिक व्ह्युज या व्हिडीओला मिळाले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “आलिया भट्ट एनसीबीला पाठिंबा देत आहे”, तसेच नशा मुक्त भारत, ड्रग्ज फ्री भारत, ड्रग्जपासून आझादी असे टॅगही दिले होते.

एनसीबीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आलिया म्हणते, “नमस्कार मित्रांनो, मी आलिया भट्ट आहे, आज मला ड्रग्ज व्यसनाच्या एका गंभीर समस्येबद्दल बोलायचे आहे. ड्रग्ज आपल्या जीवनासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कसे धोकादायक बनत आहे याबद्दल बोलायचे आहे. ड्रग्जविरुद्धच्या या विशेष मोहिमेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला पाठिंबा द्या. जीवनाला हो म्हणा आणि ड्रग्जला नाही म्हणा. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ड्रग्जविरुद्ध ई-प्रतिज्ञा घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही एनसीबीबरोबर जोडले जाऊ शकता, जय हिंद.”

नेटकरी काय म्हणाले?

या पोस्टवर सहा कमेंट्स आले आहेत. या कमेंट्समधून आलियाला ट्रोल केले होते. तसेच, हा संदेश देण्यासाठी आलिया योग्य व्यक्ती नसल्याचेदेखील म्हटले होते. काहींनी रणबीर कपूरचे नाव घेतले होते. बॉलीवूड आता ड्रग्ज घेऊ नका, अशी जागरुकता पसरवत असल्याचे म्हटले; तर आलिया भट्टने हा संदेश देणे हा विडंबन असल्याचेदेखील म्हटले गेले. या कमेंट्सनंतर नार्कोटिक्स विभागाच्या चंदीगड विभागाने या व्हिडीओचा कमेंट करण्याचा पर्याय बंद केल्याचे पाहायला मिळाले.

आलिया सध्या बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. वासन बाला यांच्या ‘जिगरा’ या चित्रपटात आलिया दिसली होती. लवकरच अभिनेत्री संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशल व रणबीर कपूरदेखील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.