Bollywood Celebrities praises Indian cricket team: भारतीय संघाने आशिया चषकच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. त्यानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
आता बॉलीवूड कलाकारांनीदेखील अंतिम सामना जिंकल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा, राघव जुयाल, जान्हवी कपूर, वरुण धवन अशा अनेक कलाकारांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. या कलाकारांनी सोशल मीडियावर काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
आशिया चषक जिंकल्यानंतर व्यक्त झाले बॉलीवूड कलाकार
बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने एक्सवर लिहिले, “वाह! काय खेळ होता. आशिया कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. अशा रोमांचकारी विजयाबद्दल शिवम, कुलदीप आणि तिलक यांचे मनापासून आभार.”
जान्हवी कपूर, वरुण धवन, मनीष पॉल, रोहित सराफ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात सध्या व्यग्र आहेत. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यावेळी आशिया कप स्पर्धेत भारत जिंकला, त्यावेळी हे कलाकार एका कार्यक्रमात होते. त्यावेळी त्यांनी भारताचा झेंडा उंचावत त्यांचा आनंद व्यक्त केला. तसेच जान्हवीने भारत माता की जय अशा घोषणादेखील दिल्या. जान्हवीने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तर अमिताभ बच्चन यांनी खास ट्विट करत त्यांचा आनंद व्यक्त केला. याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने आशिया कप स्पर्धेबद्दल बोलताना अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चन असे लिहिले होते. त्याचा संदर्भ देत बिग बींनी लिहिले, “जिंकलो. ‘अभिषेक बच्चन’ चांगला खेळलास. तिकडे त्याची बोलताना धांदल उडाली आणि इकडे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग केल्याशिवाय शत्रूंची धांदल उडवली.” त्यानंतर त्यांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तसेच जय हिंद, जय भारत, जय माँ दुर्गा असे लिहित आनंद व्यक्त केला.
अनुपम खेर यांनीदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच, रणवीर सिंगनेदेखील सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली. तिलक वर्माचे कौतुक केले. विजय देवरकोंडानेदेखील तिलक वर्माचे कौतुक केल्याचे दिसले.
विवेक ओबेरॉयने लिहिले, “समोर कोणीही असो, भारत तिलक लावूनच घरी परत पाठवेल”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. पुढे त्याने त्याच्या पोस्टमध्ये कुलदीप यादव आणि तिलक वर्माचे कौतुक केले.
तर अभिनेता राघव जुयाल हा सामना पाहण्यासाठी दुबईला गेला होता. सामना संपल्यानंतर एनआयशी संवाद साधताना तो म्हणाला, “आज खूप छान वाटत आहे. एक दिवस मी माझ्या मुलांना सांगेन की मी इतका उत्तम सामान पाहण्यासाठी आलो होतो, आज कमाल झाली.”
याबरोबरच अनेक मराठी कलाकारांनीदेखील या सामन्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.