Anushka Sharma-Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघंही आपल्या डाएटच्या बाबतीत खूप सतर्क असतात. विरुष्काच्या जेवणाच्या वेळाही ठरलेल्या आहेत, शिवाय दोघंही Vegan आहेत. २०१८ मध्ये विराटने मांसाहार पूर्णपणे सोडून Vegan डाएट फॉलो करण्यास सुरुवात केली होती. आता नुकताच विराट-अनुष्काच्या आहाराबद्दल सेलिब्रिटी शेफ हर्ष दीक्षितने खुलासा केला आहे.
‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ यांच्याशी संवाद साधताना शेफ हर्ष सांगतो, “विराट कोहली आणि अनुष्काने मला डिसेंबर २०१९ मध्ये त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जेवण बनवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यांनी मला व्हिएतनामी पदार्थ बनवायला सांगितला होता. ते दोघंही शाकाहारी आहेत. मला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ‘Pho’ ही व्हिएतनामी सूप डिश बनवायची होती. हा पदार्थ मूळ चिकन, बीफ, साप ( Snake ) यांपासून बनवला जातो. आता ते दोघंही मांसाहार करत नसल्याने ‘Pho’ डिश बनवणं हे माझ्यासमोरचं मोठं आव्हान होतं. त्यामुळे मी त्या मूळ पदार्थामध्ये संपूर्ण बदल केला.”
हर्षने पुढे सांगितलं की, “चिकन/बीफऐवजी मी ग्लूटेन-फ्री राईस नूडल्स वापरले आणि सापाऐवजी ‘स्नेक गार्ड’ म्हणजेच ‘पडवळ’ या फळभाजीचा वापर केला. कारण, व्हिएतनाममध्ये साप, बीफ खाणं खूपच सामान्य आहे. पण, विरुष्का Vegan असल्याने मी ‘Pho’ डिश बनवण्यासाठी भाज्या, फळभाज्यांचा वापर केला होता. पदार्थ सगळे व्हेज वापरले असले तरीही चवीला ती डिश व्हिएतनामच्या मूळ डिशसारखीच होती. अर्थात त्या दोघांनीही तो पदार्थ आवडीने संपवला होता, त्यामुळे मी समाधानी झालो. त्यांच्यासाठी मी खास फाइव्ह कोर्स मिल बनवलं होतं. हे पूर्णत: प्रायव्हेट डायनिंग होतं.”
दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली व्हिगन डाएटचं पालन करतात. म्हणजेच, ते दोघंही शुद्ध शाकाहारी आहेतच शिवाय ते दुग्धजन्य पदार्थांचं सेवन देखील करत नाहीत. प्राण्यांपासून मिळणारे कोणतेच अन्नपदार्थ विराट-अनुष्का खात नाहीत. दूध, दही, चीज या पदार्थांचा समावेश त्यांच्या जेवणात अजिबात नसतो. याशिवाय विराट-अनुष्का चामड्याच्या वस्तू वापरणंही टाळतात. ते दोघं चामड्याचे बूट, बॅग, जॅकेट काहीच वापरत नाहीत.