बॉलिवूडमध्ये सध्या आयुष्मान खुरानाकडे ट्रेंड सेटर म्हणून पाहिलं जातं. त्याचं करिअर त्याने निवडलेले चित्रपट आणि त्यामुळे बॉलिवूडमध्ये आलेला एक मोठा बदल याचं प्रचंड कौतुक केलं जातं. व्हिडिओ जॉकी, रोडीजमधील स्पर्धक, गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेता अशा अष्टपैलू आयुष्मानची सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच आयुष्मानने एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट २०२३’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

या कार्यक्रमात आयुष्मानने त्याच्या प्रवासाबद्दल आणि मनोरंजसृष्टीत आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं. एकूणच चित्रपटसृष्टीचं बदलेलं चित्र आणि प्रेक्षकांची बदललेली आवड याबद्दल आयुष्मान म्हणाला, “तुमच्याकडे टॅलेंट असेल तर त्याचा योग्यपद्धतीने वापर करा. दाक्षिणात्य चित्रपट मला खूप भावतात, मल्याळम चित्रपट तुमच्या डोक्याला खाद्य पुरवतात. सध्याचा प्रेक्षक विभागला आहे. काही लोक चित्रपटगृहात चित्रपट पाहणे पसंत करतात तर काहींना ओटीटीवर चित्रपट पाहणे सोयीचे वाटते. बॉलिवूडचे विषयच ओटीटीवर चालतात, त्यामुळे योग्य ओटीटी प्लॅटफॉर्म आणि योग्य कथानक लोकांसमोर आणायची गरज आहे.”

आणखी वाचा : लपूनछपून दिव्या भारतीने बांधलेली ‘या’ बॉलिवूड निर्मात्याशी लग्नगाठ; वडिलांना अंधारात ठेवून अभिनेत्रीने घेतलेला निर्णय

आयुष्मान खुराना हा एक आउटसाइडर असूनही त्याला चांगलंच यश मिळालं आहे. याविषयी बोलताना आयुष्मान म्हणाला, “पूर्वीच्या काळात बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना किंमत नव्हती, त्यावेळी स्टारकिड्सना सहज संधी मिळायची. आजही काही ठिकाणी स्टारकिड्सचाच काही ठिकाणी विचार केला जातो, पण आता परिस्थिती बदलायला लागली आहे. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर बॉलिवूड तुमचं स्वागत करतं.”

नुकताच प्रदर्शित झालेला आयुष्मान खुरानाचा ‘अॅन अॅक्शन हीरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला, पण ओटीटीवर मात्र या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटाची वेळ चुकली असंही आयुष्मानने याबद्दल भाष्य केलं. आता आयुष्मान खुराना पुन्हा ‘ड्रीम गर्ल २’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येणार आहे.