Abhinav Kashyap Talks About Aamir Khan : ‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने यादरम्यान सलमान खान व त्याच्या कुटुंबावर अनेकदा गंभीर आरोप केले. अशातच आता अभिनवने आमिर खानवरही टीका केली आहे.
अभिनवने ‘बॉलीवूड ठिकाणा’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानवर जोरदार टीका केली आहे. सलमान खाननंतर त्याने आमिर खानबद्दलही काही दावे केले आहेत. मुलाखतीत आमिरबद्दल अभिनव म्हणाला, “तो सगळ्यात मोठा लबाड कोल्हा आहे.” एवढंच काय तर त्याने आमिर खान इंडस्ट्रीत हुकूमशाही करतो असंही म्हटलं आहे.
आमिर खानवर अभिनव कश्यपने केली टीका
आमिरबद्दल अभिनव म्हणाला, “तो खूप लबाड कोल्हा आहे. तो उंचीने सलमानपेक्षाही लहान आहे, पण खूप कपटी माणूस आहे. फारच हुशार आणि लबाड चोर आहे. आमिर खान दिग्दर्शकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. तो महत्त्वाच्या लोकांना आनंदी करून, पार्ट्या देऊन, दारू पिऊन, खाऊ-पिऊ घालून त्यांची कमजोरी शोधतो. तो काम करताना एका पद्धतीचे २५ शॉट्स घेतो, पण पहिला आणि शेवटचा शॉट एकसारखाच असतो. प्रत्येक शॉट पाहतो आणि मग म्हणतो, आणखी एक, थोडं अजून बाकी आहे, हे राहिलं, ते राहिलं, पण शेवटी काही फरकच नसतो.”
अभिनवने असंही म्हटलं की, आमिरच्या वागणुकीमुळे मोठ्या दिग्दर्शकांनी त्याच्यासोबत काम करू नये. तो म्हणाला, “राजकुमार हिरानी हे खूप सक्षम दिग्दर्शक आहेत, त्यांनी इतर कलाकारांसोबत काम करून स्वतःच्या चित्रपटांवर लक्ष द्यायला हवं, पण तरीही ते आमिरकडेच जातात. राकेश ओमप्रकाश मेहरा आणि राजकुमार हिरानी मी त्यांचा आदर करतो, ते खूप यशस्वी आहेत. मग सगळेजण आमिर खानच्या घरीच का भेटतात? या ठेंगण्या माणसात असं काय आहे, जे इतरांमध्ये नाही?”
आमिर समाजासाठी काय करतो आणि किती कमावतो, याबद्दल प्रश्न उपस्थित करत अभिनव म्हणाला, “तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते स्टार्स चांगलं कमावतात आणि समाजासाठी काहीतरी करतात. पण उदाहरणार्थ, पूर आला तेव्हा आमिर खानने काय केलं? त्याचा सर्वात मोठा हिट चित्रपट ‘दंगल’ होता. खूप यशस्वी झाला. तो म्हणतो की त्याने चीनमधून २००० कोटी रुपये कमावले. मी कुठेतरी वाचलं होतं की ‘दंगल’ची कथा ज्यांच्यावर आधारित होती, त्या महावीर फोगाट यांनी हरियाणामध्ये मुलांसाठी कुस्तीचा अखाडा सुरू करण्याची विनंती केली होती. पण, असं सांगितलं गेलं की आमिर खानने नकार दिला. आखाडा सुरू करायला किती खर्च येतो? सगळे पैसे महावीर फोगाट यांच्या कथेवरच कमावले, म्हणजे ठीक आहे, त्याचं काही देणं नाही. कदाचित त्याने कथेच्या हक्कांसाठी काही पैसे दिले असतीलही.”
अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्याच्या ‘दबंग’ चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेला उधाण आलं. सलमान खाननेही आपल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ मध्ये या वक्तव्यांवर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली आहे.
