‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच काहीना काही कारणांनी चर्चेत आहे. चित्रपटातील बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी एक्झिट घेतल्याची घोषणा केल्यापासूनच या चर्चा अधिक वाढल्या आहेत. परेश रावल यांच्या एक्झिटच्या घोषणेनंतर अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ कंपनीद्वारे त्यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे वृत्त आले. त्यानंतर शनिवारी (२४ मे) असं वृत्त आलं की, परेश यांनी ही रक्कम अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसला १५ टक्के व्याजासह परत केली आहे.

‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी परेश यांचं एकूण मानधन १५ कोटी रुपये निश्चित करण्यात आलं होतं. त्यापैकी परेश यांनी त्यांना देण्यात आलेले ११ लाख रुपये हे व्याजासह परत केले. अशातच परेश रावल यांनी आज रविवारी (२५ मे) एक नवीन ट्वीट केले. या ट्वीटवरून हे स्पष्ट होते की, त्यांच्यात आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये अद्याप काही आलबेल नाही.

निर्मात्यांना व्याजासह परत केलेल्या ११ लाख रुपयासंबंधीच्या वृत्तांबद्दलच परेश यांनी एक्सवर ट्विट शेअर केलं आहे. परेश यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे, “माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत योग्य ते उत्तर पाठवले आहे. एकदा त्यांनी माझे उत्तर वाचले की, सर्व समस्या सुटतील.” दरम्यान, परेश यांनी शेअर केलेल्या ट्विटखाली अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच या संबंधित अनेक प्रश्नही विचारले आहेत.

या ट्विटखाली एका नेटकऱ्याने “हे सगळं करायची काय गरज आहे?” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “अक्षय कुमार आणि परेश रावल इतके चांगले मित्र आहेत, मग यांना अचानक काय झालं आहे?” असा प्रश्न विचारला आहे. तसंच “तुम्ही चित्रपटातून का बाहेर पडलात? तुम्ही हा चित्रपट सोडू नये. तुमच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे.” अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली आहे. तर काहींनी हा सगळा पीआर गेम तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली आहे.

दरम्यान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकदा ‘हेरा फेरी ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर तेव्हापासूनच चाहते मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटात काम करणार नसल्याचं जाहीर करताच चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.