सेलिब्रिटी म्हटलं की लोकप्रियता आलीच. त्यांना कुठेही जायचं असेल तर चाहते सेल्फीसाठी, ऑटोग्राफसाठी गर्दी करतात. काही सेलिब्रिटी चाहत्यांशी खूप प्रेमाने वागतात; पण काही मात्र चाहत्यांना वाईट वागणूक देतात. यशस्वी झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी चाहत्यांबद्दल तक्रारी करत असतात. रस्त्यावर कुठे जाताना चाहत्यांनी ओळखलं तर अरे आता यांना ऑटोग्राफ द्यावे लागतील, किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पाणीपुरी, भेळ खाता येणार नाही, अशा तक्रारी करतात.

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान मात्र या बाबतीत वेगळा आहे. त्याने चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाचं नेहमीच मोकळेपणाने स्वागत केलं आहे. चाहत्यांचं प्रेम हे आपल्या कामाचं, मेहनतीचं फळ आहे, असं शाहरुख खान म्हणतो. तो चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरत नाही.

ईशा कोप्पीकरने काय सांगितलं?

बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरने मिर्ची प्लसशी बोलताना तिला शाहरुख खानकडून मिळालेल्या शिकवणीबद्दल सांगितलं. “मला समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पाणीपुरी, भेळपुरी खाण्याची अजिबात हौस नाही. मी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून समुद्रकिनाऱ्यावर मिळणारी पाणीपुरी मागवून खाऊ शकतो,” असं शाहरुख खान म्हणाला होता. याबद्दल ईशा म्हणाली, “मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. तिथून येईल माझ्यासाठी पाणीपुरी, पण मी तिथे जाणार नाही. कारण मी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. खरं तर मला ती प्रसिद्धी हवीये, मग मी कसं म्हणू शकते, ‘अरे यार, मीडियावाले आले चष्मा लावावा लागेल, किती लोक आहेत, अरे सर्वांना ऑटोग्राफ द्यावे लागणार.’ पण खरंच एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तेव्हा करा अरे अरे. खरं तर प्रत्येकालाच अटेंशन हवं असतं आणि त्या अटेंशनसाठीच मेहनत घेतली जाते. मीही वयाच्या १५ व्या वर्षापासून काम करतेय,” असं ईशा कोप्पीकर म्हणाली.

दरम्यान, एका मुलाखतीत ईशा कोप्पीकरने इंडस्ट्रीतील संघर्ष व यशाबद्दल वक्तव्य केलं होतं. यश एका रात्रीत मिळत नाही आणि ग्लॅमरमागे बरेचदा खूप वेदना लपलेल्या असतात, ज्या इतरांना दिसत नाहीत, असं ईशाने म्हटलं होतं. “तुम्हाला एका रात्रीत काहीही मिळत नाही. रोम एका दिवसात बांधले गेले नव्हते. नकार, शिस्त, वेळ, खूप सारे प्रयत्न आणि आवड या गोष्टी लागतात. तुम्हाला जे हवंय, ते मिळवण्यासाठी प्लॅन असावा लागतो,” असं ईशा म्हणाली होती. तो प्लॅन अपयशी झाल्यास काय करायचं? असं तिला विचारण्यात आलं होतं. “प्लॅन बदला, पण लक्ष्य सोडू नका,” असं ती म्हणाली होती.

“कधीकधी काहीच न करणं ठीक आहे. कारण शाहरुख खानने म्हटलंय की ‘जे काहीही करत नाहीत ते चमत्कार करतात’. विश्रांती घ्या, सगळं रीसेट करा, शिकलेलं मागे सोडा, नव्याने गोष्टी शिका, अपग्रेड व्हा आणि पूर्वीपेक्षा जास्त स्ट्राँग होऊन परत या,” असं ईशा कोप्पीकर म्हणाली होती.