शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर या चित्रपटातील बरेच सीन्स, डायलॉग तसेच फोटोज व्हायरल होत आहेत. याबरोबरच चित्रपटातील शाहरुख खानचा क्लायमॅक्सच्या मोनोलॉगचीही चांगलीच चर्चा होत आहे. या मोनोलॉगमध्ये शाहरुखचं पात्र सामान्य जनतेला मतदानाच्या अधिकाराबद्दल आणि त्याकडे कितपत गांभीर्याने आपण लक्ष द्यायला हवं याविषयी भाष्य करतं. या मोनोलॉगमुळे आणि चित्रटात इतरही गंभीर समस्यांवर केलेल्या भाष्यामुळे याबद्दल होणाऱ्या चर्चेला एक राजकीय रंग चढला आहे.

आणखी वाचा : ‘जवान’मधील ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ असलेला हा अभिनेता आहे तरी कोण? कमल हासन व रजनीकांतबरोबरही केलंय काम

काहींनी चित्रपटावर खूप टीका केली आहे तर काही राजकीय नेत्यांनी हा चित्रपट ‘गदर २’प्रमाणे संसदेत दाखवला पाहिजे अशी मागणीही केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आक्रमक चेहेरा म्हणून चर्चेत असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा कळवा, मुंब्रा व ठाणे या शहरातील दबदबा आपल्याला ठाऊक आहेच.

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया

त्याच परिसरातील खास तरुण कॉलेजवयीन मुलांसाठी ‘जवान’ची मोफत तिकिटे वाटप करण्यात आली व शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट विवियाना मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांच्यासह बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिला असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून माहितीही दिली होती. एकीकडे या चित्रपटाला होणारा विरोध तर काही राजकीय पक्षांनी या चित्रपटाला दिलेला पाठिंबा यामुळे शाहरुखच्या ‘जवान’ची आणखीनच चर्चा होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad arranged a special show of jawan at thane for mumbra and kalwa college students avn