Shraddha Kapoor New House : बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर. ‘स्त्री २’ला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या पसंतीमुळे सिनेविश्वात श्रद्धा चर्चेत आहे. अशातच आता श्रद्धा तिचे नवे घर घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिच्या नव्या घराने वेधून घेतले आहे. श्रद्धाने नुकतेच हृतिक रोशनचा जुहू येथील आलिशान फ्लॅट भाड्याने घेणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी हा फ्लॅट वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल भाड्याने घेणार होते; मात्र काही कारणाने त्यांचा करार होऊ शकला नाही. परंतु, हा सी फेसिंग फ्लॅट आता श्रद्धा कपूर घेत आहे.
‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, जुहूच्या ज्या सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये श्रद्धा घर घेणार आहे, त्या घराचे भाडे ८.५ लाख असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ज्या अपार्टमेंटमध्ये ती घर घेत आहे, त्याच अपार्टमेंटमध्ये अक्षय कुमारचादेखील ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. जुहूच्या या अपार्टमेंटमध्ये अक्षय त्याच्या कुटुंबासोबत राहतो. ‘स्त्री २’मध्ये या दोघांनी एकत्र काम केले असल्याने श्रद्धा अक्षयच्या शेजारीच घर घेत असल्याची बातमी कळताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा- ‘स्त्री-२’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! १० व्या दिवशी कमावले ३३ कोटी, एकूण कलेक्शन तब्बल….
सध्या तरी श्रद्धा कपूर तिच्या कुटुंबासोबत राहत आहे. हे राहतं घर तिच्या वडिलांनी १९८७ मध्ये सात लाखांना खरेदी केलं होतं, त्याची किंमत आता जवळपास ६४ कोटी असल्याचे म्हटले जात आहे. श्रद्धाला समुद्र खूप आवडतो. ती कायमच निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत करते. म्हणूनच तिच्या घराच्या बाल्कनीत तिने विविध फुलझाडे लावली आहेत. ती राहत असलेल्या घरी प्राचीन आणि दुर्मीळ असे फर्निचर आहे. श्रद्धाची वेगळी प्रशस्त खोली आहे. या खोलीचा एक कोपरा तिने तिच्या पुस्तकांसाठी राखून ठेवला आहे.
काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने चित्रपटाच्या प्रमोशनकरिता कॉमेडियन झाकिर खानच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिला प्रश्न विचारला होता की, तू तुझे नवे घर घेणार आहेस की तुला आई-वडिलांच्या घरी कुटुंबासोबत राहायला आवडते? त्यावर हिंदीतील एक शायरी तिने ऐकवली होती. श्रद्धा म्हणाली, “कुछ तो जो घर का आँगन नही दे पाता, युही कोई सफर में नहीं आता” पुढे ती म्हणते की, असे काहीतरी कारण असते की, तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध घर सोडून दुसरीकडे राहावे लागते.
हेही वाचा- ‘स्त्री-२’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! १० व्या दिवशी कमावले ३३ कोटी, एकूण कलेक्शन तब्बल….
श्रद्धाने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये आणि इतर ठिकाणी देखील मी पाहिले आहे, की देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून मुंबई करिअर घडविण्यासाठी येणारी माणसे काय संघर्ष करीत आहेत. कितीतरी जण प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत या मायानगरीत राहत आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, ज्या व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि ज्यांना आई-वडिलांचे प्रेम मिळत आहे, ती माणसे भाग्यवान आहेत. तिच्या या विधानाला संमती देत झाकिरने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं.