Karisma Kapoor’s Ex-husband Sunjay Kapur Passes Away At age of 53 : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संजय कपूरचे जवळचे मित्र तसेच उद्योगपती-लेखक-अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहेल सेठ यांनी एक्स पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी सर्वांना दिली आहे.

“संजय कपूर यांच्या निधनाने खूप दु:ख झालं आहे. आज इंग्लंडमध्ये त्यांचं निधन झालं. संजयच्या कुटुंबाप्रती आणि त्यांच्या सहकाऱ्यांप्रती माझ्या सहवेदना… ओम शांती” अशी एक्स पोस्ट सुहेल सेठ यांनी शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.

‘ती’ एक्स पोस्ट ठरली शेवटची…

संजय कपूर यांची शेवटची एक्स पोस्ट १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल होती. त्यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली होती.

दरम्यान, करिश्माचे एक्स पती संजय कपूर यांचं पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिली आहे. करिश्माने २००३ मध्ये बिझनेसमन संजय कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नानंतर काही वर्षांतच या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. या दोघांना समायरा आणि कियान अशी दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये संजय व करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

२०१६ मध्ये, करिश्मा कपूरने संजय कपूर आणि त्यांच्या आईविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. संजय यांच्यावर शारीरिक शोषण आणि त्यांचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा आरोप करिश्माने केला होता. यामुळेच मुंबई पोलिसांनी संजयला समन्स बजावलं होतं. यानंतर दोघंही विभक्त झाले. दरम्यान, करिश्माशी घटस्फोट झाल्यावर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी लग्न केलं.