बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या कार्तिकच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच कार्तिकच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमधील कार्तिक आर्यनच्या जबरदस्त लूकने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा पहिला पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “चॅम्पियन येत आहे. माझ्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक आणि खास चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना खूप उत्साही व अभिमान वाटत आहे,” असं कॅप्शन लिहित कार्तिकने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा पहिला पोस्टर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने खूप मेहनत घेतल्याचं पोस्टरमधून पाहायला मिळत आहे. ‘चंदू चॅम्पियन’मधील कार्तिकचा लंगोटमधील हा पहिला लूक सध्या खूप व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: ‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीने डान्स व्हिडीओमुळे ट्रोल करणाऱ्यांची बोलती केली बंद; हर्षाली मल्होत्रा ‘इतक्या’ टक्क्यांनी दहावी झाली पास

हेही वाचा – “तथ्य नसलेल्या बातम्यांचा त्याला खूप त्रास व्हायचा”, मनोज बाजपेयींनी सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले…

कार्तिकला नव्या अवतारात पाहून इतर कलाकारांसह नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर, टोनी कक्कर, हुमा कुरेशी, निम्रत कौर, समीर विद्वांस अशा अनेक कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गंमत करत नाही, पण अंगावर शहारे आले”, “क्या बात है”, “कार्तिक काय लूक आहे”, “उत्सुकता”, “२०२४मधील ब्लॉकबस्टर चित्रपट येत आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कार्तिकच्या पोस्टवर केल्या आहेत.

कबीर खान निर्मित, दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. कबीर खान यांच्याबरोबर साजिद नाडियाडवालाने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची कथा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सुवर्णपदक विजेते पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं.

हेही वाचा –Video: “तुम्ही नैसर्गिक सौंदर्याची खरी व्याख्या…”, ऐश्वर्या नारकरांचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘चंदू चॅम्पियन’ व्यतिरिक्त त्याच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाची देखील चाहते वाटत पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिकबरोबर अभिनेत्री विद्या बालन, तृप्ती डिमरी झळकणार आहे.