जिचं नृत्य, जिचं हास्य, जिचा अभिनय पाहून सगळेच म्हणत असतील ‘दिल तो पागल है’…अशा या बॉलीवूडच्या ‘मोहिनी’चा आज ५७ वा वाढदिवस. खरंतर माधुरी आणि वयवर्ष ५७ हा आकडा ऐकून अनेकांचे डोळे विस्फारले असतील. कारण, ‘एज इज जस्ट अ नंबर’ ही उपमा या ‘धकधक गर्ल’ला अगदी तंतोतंत लागू होते. ९० च्या दशकात माधुरीच्या माधुर्याने भल्याभल्यांना वेड लावलं होतं आणि तिची ही जादू आजतागायत टिकून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. पुढे, शालेय शिक्षणानंतर विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातून माधुरीचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. तिला व्हायचं होतं मायक्रोबायोलॉजिस्ट पण, तिच्या नशिबाचा धागा अभिनयाशी एकदम घट्ट जोडला गेला होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माधुरीने वसंतराव घाडगे यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले होते. यामुळेच पुढे तिला पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर काम करता आलं. तिच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली ती १९८४ पासून…बंगाली अभिनेता तपस पालबरोबर तिने ‘अबोध’ चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही पण, सर्वत्र माधुरीच्या अभिनयाचं कौतुक जरुर करण्यात आलं. यानंतर वर्षभराने माधुरी ‘पेइंग गेस्ट’ नावाच्या टेलिव्हिजन शोमध्ये झळकली होती.

माधुरीने सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत करून आणि संघर्षाच्या जोरावर स्वत:ला बॉलीवूडमध्ये सिद्ध केलं. सलग ५ चित्रपट फ्लॉप होऊनही ती खचली नाही अन् त्यानंतर आलेल्या ‘तेजाब’ने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ‘अबोध’, ‘मानव हत्या’, ‘हिफाजत’, ‘स्वाति’ आणि ‘उत्तर दक्षिण’ या पाच चित्रपटांनंतर मोठ्या पडद्यावर ‘मोहिनी’ची जादू चालली. याबद्दल अभिनेत्री सांगते, “तेव्हा माझ्या सलग काही चित्रपटांना अपयश आल्याने मी तणावात होते. पण, त्यावेळी मला स्वत:बरोबर इतर सगळ्यांना चुकीचं सिद्ध करून मनोरंजनविश्वात माझं एक स्थान निर्माण करायचं होतं.”

हेही वाचा : ‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से

एन. चंद्राचा ‘तेजाब’ चित्रपटामुळे माधुरी रातोरात स्टार झाली. “एक दो तीन…” म्हणत तिने सगळ्यांनाच ‘मोहिनी’ घातली आणि आज हीच ‘मोहिनी’ लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यानंतर पडद्यावर आला ‘दयावान’. यात माधुरीची लहानशी भूमिका होती पण, हा चित्रपट तिने विनोद खन्नांबरोबर दिलेल्या किसिंग सीनमुळे चर्चेत राहिला. आज मागे वळून पाहताना तो शॉट द्यायला नको होता असं माधुरीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

‘तेजाब’च्या यशानंतर माधुरीने मागे वळून पाहिलं नाही. यानंतर आलेला ‘राम लखन’, ‘बेटा’, ‘खलनायक’, ‘दिल तो पागल है’, ‘त्रिदेव’, ‘दिल’, ‘हम आपके है कौन’, ‘देवदास’ या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आणि बघता बघता माधुरीचं नाव सुपरस्टार्सच्या यादीत जोडलं गेलं. तिला एकूण १४ वेळा फिल्मफेअरचं नामांकन मिळालं आहे. यातील चार वेळेला माधुरी विजयी ठरली आहे.

हेही वाचा : प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

दमदार अभिनयाबरोबरच ही ‘धकधक गर्ल’ उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखली जाते. पंडित बिरजू महाराज यांनी माधुरीबरोबर ‘देवदास’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. त्यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलंच पण, तिच्या चेहऱ्यावरचे सुंदर हावभाव पाहून ग्रेटा गार्बो आणि मर्लिन मनरोची आठवण येते अशी खास प्रतिक्रिया त्याकाळी एमएफ हुसेन यांनी दिली होती. याचदरम्यान ‘खलनायक’मधील ‘चोली कें पीछे क्या है’ या गाण्याने सर्वत्र धमाल उडवून दिली होती. अनेक ठिकाणी या गाण्यावर त्याकाळी बंदी घालण्यात आली होती. पण, अखेर माधुरीच्या दिलखेचक अदांनी सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. एमएफ हुसेन यांना ‘खलनायक’ चित्रपटातील माधुरीची भूमिका एवढी आवडली की, त्यांनी हा चित्रपट ६७ वेळा पाहिला. त्यानंतर हुसेन यांनी गजगमिनी चित्रपटाची घोषणा केली. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. अनेकांना प्रश्न पडतो माधुरीला बॉलीवूडची धकधक गर्ल का म्हटलं जातं? यामागे एक खास गोष्ट आहे.

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बेटा’ चित्रपट १९९२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात माधुरीने ‘धक-धक करने लगा, हो मोरा जियारा डरने लगा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता आणि या गाण्यामुळे माधुरी घराघरांत ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

कसं जमलं माधुरीचं लग्न?

माधुरीने करिअरच्या शिखरावर असताना डॉ. नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या लग्नाच्या बातमीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. १९९९ मध्ये माधुरी विवाहबंधनात अडकली. माधुरी दीक्षित तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगते, “आमची पहिली भेट माझ्या भावाच्या घरी पार्टीमध्ये झाली होती. माझ्या भावाच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू होत्या पण, त्याने मला काहीच कल्पना दिली नव्हती. तेव्हा याचे (श्रीराम नेने) आई-बाबा देखील आले होते. सगळं ठरवून भेटलो असतो, तर कदाचित मी तयार झाले नसते. पहिली भेट झाल्यावर आम्ही एकमेकांना फक्त ३ महिने डेट केलं. त्यानंतर लगेच आमचं लग्न झालं. त्या ३ महिन्यात मला खरंच जाणवलं की, या व्यक्तीबरोबर आपण आयुष्य घालवू शकतो. मी लगेच माझ्या आईला या नात्याबद्दल सांगितलं.”

हेही वाचा : बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक

माधुरी व श्रीराम नेने यांच्या लग्नाला गेल्यावर्षी २४ वर्षे पूर्ण झाली. या जोडप्याला रायन आणि अरीन अशी दोन मुलं आहेत. गेली अनेक वर्षे अभिनेत्री अमेरिकेत राहत होती. २०११ मध्ये माधुरी सासरच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर भारतात आली. भारतात आल्यावर तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं आणि हळुहळू ती रिअ‍ॅलिटी शोजकडे वळली. याशिवाय माधुरीने स्वत:ची नृत्य अकादमी देखील सुरू केली आहे.

पहिला मराठी चित्रपट

‘बकेट लिस्ट’ हा माधुरीचा पहिला मराठी चित्रपट. या सिनेमात तिने सामान्य महिलेची भूमिका साकारली होती. तिच्या या पहिल्या चित्रपटाबद्दल मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते सांगतात, “संसार सांभाळून, मराठी संस्कृती- परंपरा जपून आणि त्यात दोन मुलांचा सांभाळ हे सगळं तिने उत्तमप्रकारे केलं. खरंच ती घरंदाज आहे. जगभरात नाव कमावून देखील ती अत्यंत साधी आहे.” याशिवाय जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ चित्रपटाची निर्मिती माधुरी व डॉ. नेने यांनी केली होती.

सर्वसामान्य कुटुंबात जन्म, नृत्याची आवड, बॉलीवूडची ओढ, टेलिव्हिजन ते मराठी चित्रपट असा हा माधुरीचा बहुरंगी प्रवास सिनेविश्वात आजच्या घडीला येणाऱ्या प्रत्येक नवख्या तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने माधुरीचं एका आकड्याने वय जरूर वाढेल पण, तिची जादू कधीच कमी होणार नाही…

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit birthday special article her career turning point after tezaab movie release sva 00