“मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं…” आठवले ना प्रशांत दामले? ‘एका लग्नाची गोष्ट’ या अजरामर नाटकातील हे सदाबहार गाणं. मन्या-मनीच्या सुखी संसाराचा प्रवास सतराशे ते अठराशे प्रयोगांपर्यंत पोहोचला अन् नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग प्रशांत दामलेंच्या नावातच ‘सुख’ शोधू लागला. गेली चार दशकं रंगभूमीवर अधिराज्य गाजवत प्रेक्षकांबरोबर एक अनोखी नाळ त्यांनी जोडून ठेवली. या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले पण नेहमीच स्वत:वर ‘आत्मविश्वास’ ठेवून त्यांनी आयुष्याची भक्कमपणे ‘गोळा बेरीज’ केली. अशा या ‘बहुरुपी’ नटाचा आज वाढदिवस.

एकेकाळी बेस्टमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशांत दामलेंना ते रंगभूमीचे विक्रमादित्य होतील असं कधीच वाटलं नव्हतं. पण, गेली ४० वर्षे मराठी नाटकाचा डोलारा त्यांनी अभिमानाने उचलून धरलाय. १९८३ मध्ये ‘टूरटूर’ या नाटकापासून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. फेब्रुवारी १९८३ ते आजवर त्यांनी नाटकाचे १२ हजार ५०० हून अधिक प्रयोग केले आहेत. प्रशांत दामले आणि त्यांचे रंगभूमीवरचे विक्रम हे फार जुनं समीकरण आहे. मुळात या अवलिया नटाला नाटकापासून वेगळं करणं हे केवळ अशक्य आहे. ‘टूरटूर’नंतर १९८६ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘ब्रह्मचारी’ या नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

Vibhavari chawan and Varad Chawan Share Last Memories of Vijay Chawan
विजय चव्हाणांचे ‘असे’ होते शेवटचे दिवस, हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना लेकाचं लग्न पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्…
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

हेही वाचा : ‘मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं’!

व्यावसायिक रंगभूमीची सुरुवात झालेली असताना दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात त्यांनी २७ डिसेंबर १९८५ रोजी लग्नगाठ बांधली. ‘ब्रह्मचारी’ हे दामलेंचं लग्नानंतरचं पहिलं नाटक होतं. पुढे, १८८७ मध्ये त्यांना मुलगी झाली अन् १९९२ मध्ये दुसऱ्या लेकीचं आगमन झालं. दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर त्याचवर्षी प्रशांत दामलेंनी बेस्टची नोकरी सोडली अन् पूर्णवेळ नाटक करायचं हे मनात पक्क केलं. याविषयी प्रशांत दामले सांगतात, “मी अन् माझ्या पत्नीने पैशांचं संपूर्ण गणित मांडलं. माझ्या पगाराशिवाय आपण घर चालवू शकतो का याचा अंदाज घेतला. मला आठवतंय साधारणपणे माझी पत्नी गौरी ८५० रुपयांत घर चालवायची आणि कुठेही काही कमी नसायचं, तक्रार नसायची. मला सुरुवातीला नाटकासाठी २५ रुपये मिळाले होते, त्यानंतर ७५ रुपये मिळाले. १९९२ ला जेव्हा ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाला पहिला हाऊसफुलचा बोर्ड लागला तेव्हा मी गौरीशी बोललो की, आता बेस्टमध्ये आपली जागा फार काळ अडवून ठेवण्यात काही अर्थ नाही. माझ्याजागी तिथे दुसऱ्याला नोकरी लागू शकते, आता या नाटकावर आपण पुढे जाऊ शकतो, तेव्हा तिनेही मला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी नोकरी सोडून फक्त नाटकावर लक्ष केंद्रीत केलं.”

हेही वाचा : “मी पोहोचलो आहे..” १२,५०० व्या विक्रमी नाट्यप्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंनी केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. ‘टूरटूर’ या मराठी नाटकातून त्यांनी विनोदी अभिनेत्याची भूमिका साकारली होती ती प्रेक्षकांना एवढी भावली की, पुढे ४० वर्षे त्यांनी विनोदाची कास शेवटपर्यंत सोडली नाही. ‘टूरटूर’पासून सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘ब्रह्मचारी’, ‘मोरूची मावशी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘जादू तेरी नजर’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘सुंदर मी होणार’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘संशयकल्लोळ’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘लग्नाची बेडी’, ‘बहुरुपी’, ‘पाहुणा’, ‘सासू माझी ढासू’ ते अगदी अलीकडेच सुरू असलेलं ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकापर्यंत येऊन पोहोचला आहे. यामुळेच त्यांना मराठी रंगभूमीचे विक्रमादित्य अशी ओळख मिळाली.

हेही वाचा : १०० वर्ष झाली तरी ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक आजही ताजे – प्रशांत दामले

१९९२ पासून नाटकात जम बसल्यावर पुढे, २००८ मध्ये त्यांनी निर्मात्याच्या रुपात एक नवीन जबाबदारी अंगावर घेतली. यामागे खरंतर एक खास कारण आहे ते म्हणजे, २००६ मध्ये प्रशांत दामलेंनी केलेलं एक नाटक रंगभूमीवर पडलं. तेव्हा त्यांना कोणत्याही त्रयस्थ निर्मात्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे याची जाणीव झाली. नाटकाची खूप जवळून अनुभूती असल्यामुळे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही याबद्दल दामलेंना पुरेपूर माहिती होती. त्यावेळी ऑनलाइन तिकीट बुकिंगची संकल्पना एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हती. त्यामुळे नाटकाच्या तिकीट विक्रीसाठी एका मित्राशी चर्चा करून प्रशांत दामलेंनी खास तिकीट बुकिंगसाठी भारतात ‘ओळख ना पाळख’ हे पहिलं ऑनलाइन गेटवे सुरू केलं होतं. परंतु, त्यानंतर एक-एक जबाबदाऱ्या वाढत गेल्याने पुढे हे अ‍ॅप त्यांनी बंद केलं. आता जवळपास १५ वर्षांनी त्यांनी अलीकडेच पुन्हा एकदा त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘तिकिटालय’ हे अ‍ॅप खास मराठी सिनेमे व नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुरू केलं आहे.

व्यवसाय म्हणून नाटक करताना…

प्रशांत दामले अमुक तमुकच्या मुलाखतीत सांगतात, “व्यवसाय म्हणून नाटक करताना लोकांची नेमकी आवड काय आहे हे प्रत्येक कलाकाराने पाहिलं पाहिजे. काहीजण मला म्हणतात, अरे तू प्रेक्षकशरण नट आहेस यावर माझं थेट उत्तर असतं ‘हो अर्थात आहेच’ अनेकजण म्हणतात ‘काय तू सतत कॉमेडी नाटकं करतोस?’ असे प्रश्न विचारणाऱ्यांनी सर्वात आधी तीन तास अशा धाटणीची नाटकं करून दाखवावी. त्यांनी प्रेक्षकांना हसवून दाखवावं…एकतर आधीच अडीच ते तीन तास आपण प्रेक्षकांना अंधारात बसवतो. बरं त्यांना सलग रंगमंचाकडेच पाहावं लागतं. चहा-पोहे असलं काही मिळत नाही. त्यामुळे त्यांना काय आवडतं हे पाहणं गरजेचं आहे. पण खरं सांगायचं झालं, तर कॉमेडी वाटत असली तरीही माझी सगळी नाटकं एक वेगळा संदेश देऊन जातात. ‘साखर खाल्लेला माणूस’ हे मधुमेहावर आधारित नाटक आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’मध्ये स्त्रियांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. आपण अडीच तास गांभीर्याने यावर नाही बोलू शकत. त्यामुळे दोन-अडीच तास प्रेक्षकांना हसवणं, त्यांना खिळवून ठेवणं, आम्हाला जो मुद्दा सांगायचा आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे.”

प्रशांत दामलेंनी केवळ प्रेक्षकांच्या नव्हे तर करोना काळात बॅकस्टेजला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचंही मन जिकलं. त्यांच्या टीममधील अनेक लोकांचं त्यांनी पालकत्व स्वीकारलं. कुटुंबप्रमुख या नात्याने अभिनेत्याने या कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली. यामुळेच या बहुरंगी कलाकारामध्ये दडलेलं माणूसपण सर्वांसमोर आलं. आयुष्यातील कठीण प्रसंगाला सुद्धा ते हसत हसत सामोरे गेले. मे २०१३ मध्ये प्रशांत दामलेंना हृदयविकाराचा झटका आला होता. या घटनेनंतर त्यांच्या मुलीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना ते आपल्या मुलीला “पाच मिनिटांत आलो गं” असं म्हणाले होते. यावरून त्यांचा स्वभाव कसा आहे याची प्रचिती आपल्याला होते.

रंगभूमीवरचा हा निखळ मनोरंजनाचा वसा जपताना प्रशांत दामलेंनी विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार याशिवाय लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावावर पाच विविध रेकॉर्ड्सची नोंद आहे. ठराविक एका नाटकाचे हजार प्रयोग, एकाच दिवशी तीन प्रयोग, १२ हजार ५०० प्रयोग, विविध १२ देशांमधील प्रयोग या रेकॉर्ड्सचा यात समावेश आहे. आजच्या काळात ओटीटीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात असताना प्रेक्षकांना नाटकांशी बांधून ठेवणाऱ्या या विक्रमादित्य नाट्यकर्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!