Madhuri Dixit completes 26 years of marriage: अभिनेत्री माधुरी दीक्षित ही बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने १९८४ साली हिंदी चित्रपट ‘अबोध’मधून पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

करिअरच्या सुरुवातीला काही वर्षे अभिनेत्रीला संघर्ष करावा लागला. मात्र, १९८८ साली प्रदर्शित झालेल्या तेजाब चित्रपटातून अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील एक दो तीन हे गाणे प्रचंड गाजले. त्यानंतर माधुरीने मागे वळून पाहिले नाही.

‘देवदास’, ‘दिल तो पागल हैं’, ‘आजा नचले’, ‘खलनायक’, ‘दिल’, ‘परिंदा’, ‘लज्जा’, ‘हम आपके है कोन’, ‘बेटा’, असे अनेक चित्रपट गाजले. अभिनेत्रीला जितकी तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळख मिळाली, तितकीच तिच्या नृत्यामुळेदेखील माधुरी लोकप्रिय ठरली.

माधुरी दीक्षितची खास पोस्ट

आता माधुरी दीक्षित तिच्या चित्रपट किंवा भूमिकांमुळे चर्चेत नाही तर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आज माधुरी दीक्षितच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त माधुरीने तिचे पती डॉक्टर नेने यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत, तर विविध ठिकाणी फिरायला गेलेले असताना काढलेले काही फोटो पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यावरील काढलेले फोटो माधुरीने शेअर केलेले पोस्टमध्ये दिसत आहेत. माधुरी व श्रीराम नेने यांच्यातील काही सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत. यामध्ये ‘तू हैं तो’ हे गाणे ऐकायला मिळत आहे.

हे फोटो शेअर करताना माधुरी दीक्षितने लिहिले, “क्षणांपासून ते आठवणींपर्यंत, गेली २६ वर्षे एकत्र आयुष्य जगत आहोत. हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी”, असे लिहित तिने तिचे पती डॉक्टर नेनेंना टॅग केले. माधुरीने काही खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे दिसत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “२६ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा”, “सगळ्यात सुंदर जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, “तुम्ही लग्न टिकवून दाखवले, नाहीतर ही झगमगाट असलेली सिनेमाची दुनियादारी खूप बिन गरजेची आहे, तुमचे खूप अभिनंदन”, “तुम्ही बेस्ट कपल आहात, तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात”, “अभिनंदन”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी १९९९ ला लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर माधुरी पतीबरोबर अमेरिकेत गेली होती. अभिनयातून तिने काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती कुटुंबासह भारतात परतली असून गेल्या काही वर्षांमध्ये तिने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. तिने पंचक, बकेट लिस्टसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, काही रिअॅलिटी शोमध्ये ती जज म्हणून काम करते.

दरम्यान, माधुरी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ती लक्ष वेधून घेते. तिच्या या पोस्टना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेतून भेटीला येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.