Madhuri Dixit Refused To Work With Govinda In Illzaam : माधुरी दीक्षित व गोविंदा हे दोघे ९०च्या काळातील लोकप्रिय कलाकार. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. माधुरी दीक्षित व गोविंदा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं. परंतु, एकदा माधुरीने गोविंदासह चित्रपटात काम करण्यास नकार दिलेला.

माधुरी दीक्षितला बॉलीवूडमध्ये धकधक गर्ल या नावानेही संबोधलं जायचं. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने व सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली; तर दुसरीकडे गोविंदानेही त्याच्या हटके स्टाईलने व विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु, माधुरी दीक्षितला गोविंदाबरोबरच्या चित्रपटाची विचारणा झाली असताना तिने त्यासाठी नकार दिल्याचं लोकप्रिय दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी म्हटलं आहे.

माधुरी दीक्षितने गोविंदाबरोबर काम करायला दिलेला नकार

माधुरीबद्दल पहलाज म्हणाले, “मी रिकू राकेश नाथ याच्यामार्फत गोविंदाला भेटलो. नंतर मीच त्याला माधुरीचा असिस्टंट म्हणून कामाला लावले तो तिच्या कामासंदर्भातील गोष्टी पाहत असे. मी गोविंदा व माधुरी यांची एका चित्रपटासाठी निवड केलेली. नंतर रिक्कू आणि काही ८-१० निर्मात्यांनी मिळून गोविंदाच्या विरोधात एक ग्रुप बनवला. परंतु, त्यांनी ठरवल्यानुसार त्यातील एकही चित्रपट बनला नाही.” पहलाज यांनी ‘इल्जाम’ चित्रपटासाठी माधुरी व गोविंदा यांची निवड केलेली, जो गोविंदाचा दुसरा चित्रपट होता. परंतु, माधुरीने गोविंदासह काम करायला नकार दिलेला.

पहलाज यांनी नंतर नीलम कोठारी यांची त्या चित्रपटासाठी निवड केली आणि तो निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला, कारण ‘इल्जाम’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता आणि नीलम रातोरात स्टार झालेली. याबद्दल बोलताना निर्माते म्हणाले, “मी माधुरीच्या जागी नीलमची ‘इल्जाम’साठी निवड केली, त्यानंतर मी माधुरीला ‘आग ही आग’ या चित्रपटासाठी विचारलं, पण माधुरी तेव्हा जे चित्रपट करत होती ते फ्लॉप ठरायचे; त्यामुळे मी पुन्हा ‘आग ही आग’मध्ये नीलमची निवड केली आणि तिच्याबरोबर ‘पाप की दुनिया’ या चित्रपटातही काम केलं.”

माधुरी दीक्षितवर रागावलेले पहलाज निहलानी

पहलाज यांनी सांगितलं की, त्यांचे तिन्ही चित्रपट एकामागोमाग हिट ठरत असताना माधुरीचे अनेक प्रॉजेक्टस ठप्प पडत होते. पहलाज म्हणाले, “मला राग आला होता की मी तिला ज्या चित्रपटांसाठी विचारतो त्यासाठी ती नकार देते. रिक्कूसुद्धा मला कारणं द्यायचा. माधुरीचे चित्रपट तेव्हा फ्लॉप होत होते, पण माझ्या तिन्ही चित्रपटांच्या गोल्डन जुबली झाल्या होत्या.”

माधुरीबद्दल पहलाज म्हणाले, “नंतर रिक्कूने मला विनंती केली की माधुरीच्या चित्रपटासाठी तुम्ही मुहूर्ताच्यावेळी याल का, फक्त तेवढं करा. त्यावेळी इंडस्ट्रीत चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीपूर्वी मुहूर्त पार पडत नव्हते, तेव्हा मी तीन चित्रपटांचे मुहूर्त केले, ज्यामध्ये माधुरी दीक्षित, अनिल कपूर आणि चंकी पांडे यांच्या चित्रपटांचा समावेश होता.”

पहलाज यांनी ज्या चित्रपटाचा मुहूर्त पार पाडला, त्यामध्ये माधुरीच्या ‘तेजाब’ या चित्रपटाचा समावेश होता, जो तिच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट ठरला. त्यासाठी तिला ‘फिल्मफेअर’चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. नंतर माधुरी व गोविंदा यांनी ‘महा-संग्राम’, ‘इज्जतदार’ आणि ‘पाप का अंत’ या चित्रपटांत काम केलं.