Madhuri Dixits which film earn Rs 100 crore: १९९० च्या काळात बॉलीवूडमध्ये रोमँटिक, थ्रिलर, तसेच कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होत होते. अशा काळात एक सिनेमा प्रदर्शित झाला.

यामध्ये १४ गाणी होती. विशेष म्हणजे हा चित्रपट तीन तास २६ मिनिटांचा होता. मात्र, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. हा ब्लॉकबस्टर चित्रपट १३५ आठवडे चित्रपटगृहांत चालला होता आणि १०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. आता चित्रपट नेमका कोणता, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घेऊयात या गाजलेल्या चित्रपटाविषयी….

माधुरी दीक्षितचा कोणता चित्रपट ठरलेला १०० कोटी कमाई करणारा बॉलीवूडचा पहिला सिनेमा?

२००८ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा गजनी हा चित्रपट १०० कोटी कमाई करणारा बॉलीवूडचा पहिला चित्रपट असल्याचे मानले जात होते. मात्र, समोर आलेल्या अहवालांनुसार गजनी हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर १४ वर्षे आधी माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली होती.

सूरज बडजात्या दिग्दर्शित हम आपके हैं कौन हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. ‘मैंने प्यार किया’ चित्रपटानंतर सूरज बडजात्या यांचा हा दुसरा चित्रपट होता. हम आपके हैं कौन या चित्रपटात ‘मैंने प्यार किया’मधील जवळजवळ सगळेच कलाकार होते. फक्त प्रमुख नायिका वेगळी होती. भाग्यश्रीऐवजी या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत होती.

सहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर ११७ कोटी रुपये कमावले. परदेशातही या चित्रपटाने ११ कोटींची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाने जगभरातून १२८ कोटींची कमाई केली होती.

‘हम आपके हैं कौन’ चित्रपटाची जवळजवळ ७५-१२५ दशलक्ष तिकिटे विकली गेली. सुमारे १३५ आठवडे चित्रपटगृहांमध्ये चालला होता. तसेच तो जगभरात ४,३५० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. १०० आठवड्यांहून अधिक काळ हा चित्रपट हाऊसफुल होता.

दरम्यान, माधुरी आजही विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. आता आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अभिनयाबरोबरच, अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.