Parineeti Chopra & Raghav Chadha Baby Boy Name : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व राघव चड्ढा या लोकप्रिय जोडीने ऑक्टोबर महिन्यात चाहत्यांबरोबर आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली. राघव-परिणीतीच्या घरी १९ ऑक्टोबरला चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं. यानंतर परिणीती आपल्या गोंडस बाळाचं नाव काय ठेवणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर बाळ १ महिन्याचं झाल्यावर परिणीतीने लाडक्या लेकाचं बारसं केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लाडक्या लेकाचं नाव रिव्हिल केलं आहे.
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी त्यांच्या मुलाचं नाव ‘नीर’ असं ठेवलं आहे. लेकाचं नाव जाहीर करताना परिणीतीने खास पोस्ट शेअर केली आहे. संस्कृत श्लोक कॅप्शनमध्ये लिहीत अभिनेत्रीने लेकाच्या नावाचा अर्थ सर्वांना सांगितला आहे. परिणीती लिहिते, “जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर! आम्ही त्याचं नाव ठेवलंय ‘Neer’- शुद्ध, दिव्य आणि अमर्याद”
परिणीतीने बाळाचं नाव जाहीर केल्यावर चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी परिणीतीच्या पोस्टवर हार्ट इमोजी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर, अभिनेत्याच्या चाहत्यांनी “नाव खूपच सुंदर ठेवलंय” अशा प्रतिक्रिया परिणीतीच्या पोस्टवर दिल्या आहेत.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात परिणीती व राघव यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना ते लवकरच आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. अभिनेत्रीने एका केकवर १+१=३ असं कॅप्शन आणि त्याखाली चिमुकल्या पायांचे ठसे असलेला फोटो शेअर केला होता. यानंतर ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्रीच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं. आता बाळाला १ महिना पूर्ण झाल्यावर परिणीतीने त्याचं नाव ‘नीर’ ठेवलंय असं जाहीर केलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री परिणीती चोप्रा व राघव चड्ढांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. उदयपूरमध्ये यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. या दोघांची पहिली भेट लंडन येथे झाली होती. राघव यांना राजकीय कारकिर्दीसाठी तर परिणीतीला अभिनय क्षेत्रातील कामासाठी ब्रिटिश काउन्सिलकडून पुरस्कार मिळणार होता. यानंतर दोघंही दिल्लीत भेटले. त्यांच्या प्रेम कहाणीला २०२२ पासून खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं अन् दोघांनी सप्टेंबर २०२३ मध्ये थाटामाटात लग्न केलं.
