Shah Rukh Khan 60th Birthday : शाहरुख खानने आज त्याचा ६० वा वाढदिवस कुटुंबीय अन् मनोरंजनसृष्टीतील जवळच्या मित्रमंडळींसह दणक्यात साजरा केला. शाहरुखचा वाढदिवस हा त्याच्या सगळ्या चाहत्यांसाठी जणू सोहळाच असतो. कारण, लाखो SRK प्रेमी या खास दिवशी मन्नतबाहेर गर्दी करतात. शाहरुख आपल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मन्नत बंगल्याच्या बाल्कनीमध्ये येतो.
दरवर्षी २ नोव्हेंबरला मन्नतबाहेर मध्यरात्रीपासूनच चाहते प्रचंड गर्दी करतात. आपल्या ‘हिरो’ची एक झलक पाहण्यासाठी चाहते दूरचा प्रवास करून आलेले असतात. शाहरुख कितीही नियोजित कार्यक्रम असले तरीही न चुकता सर्वांना अभिवादन करण्यासाठी यायचा. मात्र, यंदाच्या वर्षी शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही अन् त्याच्या तमाम चाहत्यांचा हिरमोड झाला.
सध्या मन्नतमध्ये नुतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे खान कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून भाडेतत्त्वावर राहत आहे. याशिवाय शाहरुख खानच्या चाहत्यांनी मध्यरात्रीपासूनच बॅण्डस्टँड व मन्नत परिसराजवळ मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शाहरुख बाहेर आला असता तर, या गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण गेलं असतं आणि यातून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे किंग खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या तमाम चाहत्यांची माफी मागितली आहे.
शाहरुख खान लिहितो, “मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो…मात्र, गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे आणि सर्वांची सुरक्षा लक्षात घेता…मी आज तुम्हाला सर्वांना अभिवादन करण्यासाठी बाहेर येऊ शकणार नाही. माझ्या टीमने सुद्धा हाच सल्ला दिला आहे….त्यामुळे बाहेर माझी मनापासून वाट पाहणाऱ्या माझ्या प्रियजनांची मी माफी मागतो. तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम आणि विश्वास माझ्यावर दाखवला यासाठी मी कायम कृतज्ञ असेन. आज तुम्ही मला पाहायला आला आहात पण, खरंतर तुमची भेट होऊ शकली नाही…हा क्षण मीच सर्वात जास्त मिस करेन. आपण लवकरच भेटू…तुम्हा सर्वांना खूप प्रेम!”
दरम्यान, शाहरुख खानने त्याचा यंदाचा वाढदिवस अलिबाग येथील फार्महाऊसवर साजरा केला. यानंतर तो मन्नत परिसरात आला होता मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव चाहत्यांची भेट घेणं शक्य झालं नाही. याशिवाय ६० व्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने त्याच्या आगामी ‘किंग’ सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि टीझर शेअर केला आहे. हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. ‘किंग’मध्ये शाहरुखची लेक सुहाना खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील झळकणार आहे.
