Shah Rukh Khan on manifestation mantra: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. अनेकदा किंग खान त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच २०२५ मधील हुरुच रीच लिस्ट जाहीर झाली. या लिस्टनुसार शाहरुख खानचा समावेश अब्जाधीशांच्या यादीत झाला आहे.

आता एका रिअल इस्टेट कंपनीने दुबईतील एका टॉवरचे नाव शाहरुखच्या नावावरून ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. हा टॉवर २०२९ मध्ये सुरू होणार आहे. आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रेडिटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फराह खान शाहरुख खानला त्याच्या एका जुन्या वक्तव्याबाबत विचारते, तुला कोणीतरी म्हणाले होते की तुझे स्टारडम कधीतरी संपणार आहे, त्यावर तू म्हणालेला की मी कायम स्टार राहणार आहे. मी पुढच्या १०० वर्षांसाठी स्टार असणार आहे; तर इतका आत्मविश्वास कुठून येतो? असं काही आहे का की शाहरुख खान जेव्हा काही बोलतो, तेव्हा ते खरे होते.

“मी सगळ्याच गोष्टी खूप…”

त्यावर शाहरुख हसत म्हणाला, “मी ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील मॅनिफेस्टेशन मंत्रावर विश्वास ठेवतो. खरेतर मी सगळ्याच गोष्टी खूप निरागसतेने जशी लहान मुले बोलतात तसे बोलतो. मला माहीत आहे मी आता ६० वर्षांचा आहे. पण, मला मनापासून वाटते की कोणी लहान मुलांप्रमाणे काही इच्छा व्यक्त केली आणि ती युनिव्हर्सला सांगितली, जशी ओम शांती ओम चित्रपटात आहे.”

त्यावर अभिनेता पुढे म्हणाला, “उदाहरणार्थ जर कोणी विचारले तर तुम्ही किती वर्षे जगणार आहात? त्यावर तुम्ही फक्त असं म्हणून शकता की २०० ते २५० वर्षे मी जगणार आहे. मी यावर विश्वास ठेवतो. मला वाटते की जर मी खूप प्रेमाने, कोणत्याही स्वार्थाशिवाय त्यावर विश्वास ठेवला, तर सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात घडतात.”

ज्या कार्यक्रमात दुबईतील प्रॉपर्टीचे नाव Shahrukhz असे ठेवण्यात येणार असल्याचे घोषित केले, त्या कार्यक्रमात शाहरुख म्हणालेला, “माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता. मला वाटते की हा खूप मोठा सन्मान आहे. आता जेव्हासुद्धा मी माझ्या मुलांसह दुबईला येईन, तेव्हा मी त्या इमारतीकडे बोट दाखवेन आणि माझ्या मुलांना सांगेन की पाहा, तुमच्या वडिलांची बिल्डिंग आहे, हे खूप सुंदर आहे.”

दरम्यान, शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेता लवकरच किंग चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.